मुंबई- लोकसभेचे मतदान संपल्यानंतर मी लगेचच दुष्काळी दौऱयावर गेलो. त्यामुळे सरकारला दुष्काळाची आठवण झाली, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. यशवंराव चव्हाण केंद्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षांतर्गत दुष्काळी आढावा बैठकीचे आयोजन केले होते. या बैठीकीनंतर पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
सरकारला दुष्काळी स्तिथीचे गांभीर्य नाही. राज्यात यंदा परतीचा पाऊस चांगला झाला नाही. त्यामुळे दुष्काळाची भीषण स्थिती आहे. विदर्भातील काही जिल्हे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात दुष्काळाची तीव्रता अधिक आहे. दुष्काळी दौऱ्यासाठी मी सोलापूरला पोहचलो. त्यामुळे राज्य सरकराने याची दाखल घेतली. सरकार जागे झाले आणि त्यांनी बैठका घ्यायला सुरुवात केली. मी जर दौरा केला नसता तर तेही झाले नसते, असेही पवार म्हणाले.
ते पुढे म्हणाले, विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती या भागात तसेच मराठवाड्यातील बहुतांश भाग आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या भागात दुष्काळाची गंभीर अवस्था आहे. एक पीक जाणे आणि फळबाग जाणे या नुकसानीत जमीन-आसमानचा फरक आहे. एक फळबाग उभी करण्यासाठी चार-पाच वर्षांचा कालावधी लागतो. या दुष्काळात फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील शिष्य मंडळासह मुख्यमंत्र्यांना भेटून दुष्काळ निवारण आणि मदतीसंदर्भात मागण्या करतील.
सध्या चारा छावण्यात प्रत्येक शेतकऱ्यांची पाच जनावरे घेतात. हे बरोबर नाही. सरसकट जनावरे घेतली पाहिजेत. ज्या शेतकऱ्यांकडे लहान मोठी पाचपेक्षा अधिक जनावरे आहेत त्यांनी काय करायचे ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. चाऱ्यासाठी मोठ्या जनावरांना प्रतिदिन ९० रुपये दिले जातात. ही तुटपुंजी रक्कम आहे. त्यासाठी रक्कम वाढवली पाहिजे. हिरव्या चाऱ्यासह जनावरांना पेंडही मिळावी. त्यासाठी रक्कम वाढवून देणे आवश्यक आहे. जनतेला आणि जनावरांनाही पाणी मिळावे अशी तरतूद केली पाहिजे, असेही पवार यांनी यावेळी सांगितले .