मुंबई -मी यापूर्वी ४ वेळा मुख्यमंत्री होतो. त्यामुळे आता मुख्यमंत्री होण्यास कदापीही तयार नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीने एकत्र निवडणूक लढवली. काही निर्णय झाला तर आम्ही एकत्रच घेणार आहोत. मात्र, उद्या काय होईल, हे देखील सांगता येत नसल्याचे शरद पवार म्हणाले. मात्र, आता अमित शाहंसारख्या तज्ज्ञांचे कौशल्य पाहण्यासाठी आम्ही उत्सुक असल्याचा टोला देखील पवार यांनी यावेळी लगावला. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
अमित शाहंसारख्या तज्ज्ञांचे कौशल्य पाहण्यासाठी उत्सुक - शरद पवार - शरद पवारांचा अमित शाहंना टोला
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेवरून भाजप अध्यक्ष अमित शाह यांना टोला लगावला आहे.
देशातील सर्वच राज्यात पोलिसांची अवस्था गंभीर आहे. आठवड्याची सुट्टी अनेकदा मिळत नाही. अशा परिस्थितीमध्ये सर्व कायदा सुव्यवस्था सांभाळणाऱ्यांवर हल्ला होणे गंभीर आहे. त्यात दिल्लीच्या नागरिकांनी यावेळी घेतलेली भूमिका स्वागतार्ह आहे. मात्र, या प्रकाराबाबत केंद्राला त्यांची जबाबदारी टाळता येणार नाही. केंद्रांनी या प्रकाराची गंभीर दखल घ्यावी, असे शरद पवार म्हणाले. वकील आणि पोलिसांमध्ये झालेल्या हाणामारी प्रकरणी ते बोलत होते.
बार कौन्सिलच्या अध्यक्षांनी यामध्ये लक्ष्य घालावे. येथील पोलिसांची जबाबदारी केंद्राची जबाबदारी आहे. त्याची केंद्र सरकारने दखल घेतली आहे.
अतिवृष्टीने महाराष्ट्राची गंभीर अवस्था झालेली आहे. त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी. कर्जमाफी मिळावी. तसेच विमा कंपन्याकडून विमा मिळावा. तसेच केंद्रीय अर्थ विभागाने याची दखल घ्यावी, असेही पवार म्हणाले.