मुंबई- कोणत्याही विषयावर विद्यार्थ्यांना पी. एचडी करायला सुमारे 3 वर्षे लागतात. पण, चंद्रकांत पाटील यांना माझ्यावर पी. एचडी करण्यासाठी 12 वर्षे लागतील, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लगावला. वडाळा येथे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसकडून 'तरुणांशी संवाद' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पवार बोलत होते.
शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस यावेळी कार्यक्रमात सोमय्या महाविद्यालयातील एका विद्यार्थीनीने प्रश्न विचारला होता की, चंद्रकांत पाटील यांनी तुमच्यावर पीएचडी करणार असल्याचे म्हटले आहे. त्यावर तुमचं मत काय आहे, त्यावर पवार यांनी पाटील यांना हा टोला लगावला. त्यामुळे उपस्थितांमध्ये जोरदार हशा पिकला, तर तरुणांनी पवारांच्या या उत्तराचे टाळ्या वाजवून स्वागत केले.
मुंबई आणि परिसरातून आलेल्या विद्यार्थ्यांनी पवारांना आपल्या करीयर आणि अभ्यासक्रमातील बदलावरही अनेक प्रश्न विचारले. पी.एचडीसाठी मिळत नसलेला भत्ता, रुग्णालयातील डॉक्टर विद्यार्थ्यांचे प्रश्न, आयटीआयमधील विद्यार्थी भत्ता पासून ते मुंबईतील वसतिगृहाच्या प्रश्नाकडे पवारांचे लक्ष वेधले. त्यातील बहुसंख्य प्रश्नांना पवारांनी आपण स्वतः लक्ष घालून ते सुटण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन देत तरुणांशी संवाद साधला.
तरुणांनी राजकारणात आले पाहिजे, आणि त्याची सुरुवात ही महाविद्यालयातील निवडणुकांत होते, त्यामुळे राज्यात लवकरच महाविद्यालयीन निवडणुका घेतल्या जाव्यात, त्यासाठी मी सरकारला सूचना करेल, असेही पवार म्हणाले. राजकारणात येण्यासाठी काही अभ्यासक्रम नाही का? असा एका विद्यार्थ्याने प्रश्न विचारला असता, पवार म्हणाले, तरुणांना राजकारणात येण्यासाठी कोणत्या अभ्यासक्रमाची गरज नाही. कठोर मेहनत आणि पराभवाने खचून न जाता पुन्हा कष्ट करण्याची तयारी असल्यास राजकारणात यशस्वी होता येते. आजच्या दिवशी मी 52 वर्षांपूर्वी विधानसभेत निवडून गेलो होतो, त्यावेळी मी 26 वर्षाचा होतो, अशी आठवण त्यांनी तरुणांना सांगितली.
यावेळी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना पवार उत्तर देत असतानाच मध्येच प्राचार्य संघटनेने आपले प्रश्न मांडून त्यातही आपण लक्ष घालावे, अशी मागणी केली. तर मुंबई विद्यापीठातील लोककला अकादमीला अनुदान मिळत नसल्याचा विषय यावेळी पवारांच्या समोर मांडण्यात आला. पवारांनी आपल्या शैलीत या सर्व प्रश्नांना उत्तरे देत त्यावरील मार्ग काढण्याचे आश्वासन दिले.
दरम्यान, आमचं सरकार बाबू निर्माण करणार नाही, तर २ लाख रुपये पगार घेणारा युवक निर्माण करेल, असा विश्वास व्यक्त करतानाच युवकांसाठी सरकार वेगळं स्कील निर्माण करत असल्याची माहिती राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली. भारत हा युवा देश आहे. युवकांची अपेक्षा, आशा पुर्ण करण्याची जबाबदारी सरकारची आहे. महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर शरद पवारांनी माझ्याकडे कौशल्य विकास विभागाचे काम दिले आहे. त्यामुळे युवकांनी त्यांच्याकडील वेगवेगळ्या कल्पना दिल्या पाहिजेत, असे आवाहन नवाब मलिक यांनी यावेळी केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यासह मुंबई अध्यक्ष आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, विद्यार्थी अध्यक्ष अमोल मातेले, प्रदेश प्रवक्ते महेश तपासे, मुंबई युवक अध्यक्ष निलेश भोसले, प्राचार्य संघटनेचे अध्यक्ष डॉ. शिवारे उपस्थित होते.