महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शरद पवारांनी दिल्लीत बोलावली राष्ट्रवादी नेत्यांची बैठक - अनिल देशमुख आरोप प्रकरण शरद पवार बैठक

राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत आपल्या पक्षाच्या नेत्यांची एक तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपांबाबत चर्चा होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

Sharad Pawar
शरद पवार

By

Published : Mar 21, 2021, 10:04 AM IST

Updated : Mar 21, 2021, 10:26 AM IST

मुंबई - माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या कथित पत्रानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत बैठक बोलावली आहे. शरद पवारांनी अजित पवार आणि जयंत पाटील यांना तातडीने दिल्लीला बोलावून घेतले आहे. गृहमंत्री अनिल देखमुख यांच्यावर लावलेल्या गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची शक्यता नाकारता येत नाही.

शरद पवारांनी दिल्लीत बोलावली राष्ट्रवादी नेत्यांची बैठक

दर महिन्याला 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून पोलीस अधिकारी सचिन वाझेला देण्यात आल्याचा आरोप माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या कथित पत्रामध्ये केला आहे. हे आरोप गृहमंत्री अनिल देशमुख यांनी फेटाळून लावले आहेत. तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा मागितला आहे.

गृहमंत्र्यांनी फेटाळले आरोप-

दरम्यान, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माजी पोलीस आयुक्त सिंग यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. 'परमबीर सिंग यांनी स्वतःला वाचवण्यासाठी तसेच पुढच्या कायदेशीर कारवाईपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी हा खोटा आरोप केला आहे. मुकेश अंबानी प्रकरणी तसेच मनसुख हिरेन हत्याप्रकरणी सचिन वाझे यांचा सहभाग स्पष्ट होत असताना व त्याचे धागेदोरे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यापर्यंत पोहोचणार असल्याची शक्यता आहे' असे ट्विट गृहमंत्र्यांनी केले आहे.

परमबीर सिंग होते नाराज -

सचिन वाझे प्रकरणात मुंबई पोलीसांच्या भूमिकेवर संशय निर्माण झाल्याने गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची तडकाफडकी बदली केली. तसेच परमबीर सिंग यांच्या चुका माफ करण्यासारख्या नव्हत्या, असे वक्तव्यही केले होते. त्यानंतर परमबीर सिंग हे नाराज असल्याची चर्चा पोलीस दल तसेच राजकीय वर्तुळात सुरू होती. काल(शनिवार) परमबीर सिंग यांच्या नावाने मुख्यमंत्री कार्यालयात एक पत्र आले असून या पत्रातून थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत. मात्र, हे पत्र परमबीर सिंग यांच्या अधिकृत ईमेल आयडीवरून आले नसल्याने या पत्राची शहानिशा केली जाईल, असे प्रकारचे स्पष्टीकरण मुख्यमंत्री कार्यालयातून देण्यात आले आहे.

दोन दिवसांपूर्वी गृहमंत्री आणि शरद पवार यांच्यात बैठक -

सचिन वाझे यांना अटक केल्यानंतर या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त होत होता. याची दखल घेत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची तातडीने बदली केली होती. या बदलीनंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांना शरद पवारांनी दिल्लीला बोलावून घेतले होते. सचिन वाझे प्रकरण आणि परमबीर सिंग यांची भूमिका या सर्व मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाली होती.

Last Updated : Mar 21, 2021, 10:26 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details