नवी दिल्ली - राजद नेते तेजस्वी यादव यांनी शरद पवार यांना ट्विट करून शुभेच्छा दिल्या आहेत. भारतीय राजकारणातील न डगमगणारा, शेतकऱ्यांचा खरा नेता असलेल्या शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, तुम्हाला निरोगी आणि दीर्घायुष्य लाभो, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
शरद पवारांचा ८० वा वाढदिवस : शरद पवारांच्या आठवणी सांगताना हसन मुश्रीफांना अश्रू अनावर
19:59 December 12
शरद पवार भारतीय राजकारणातील न डगमगणारा, शेतकऱ्यांचा खरा नेता - तेजस्वी यादव
19:35 December 12
गोरगरीब जनतेसाठी सतत लढणाऱ्या शरद पवारांना शुभेच्छा - छगन भुजबळ
नाशिक- माजी केंद्रीय कृषिमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त राज्यात ऑनलाइन व्हर्च्युअल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. नाशिक शहरातही औरंगाबाद रस्त्यावरील जय शंकर लॉन्स येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थितीत व्हर्च्युअल रॅलीला संबोधित केले.
17:10 December 12
कोल्हापुरात शरद पवारांच्या आठवणी सांगताना हसन मुश्रीफांना अश्रू अनावर
कोल्हापूर- राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या आठवणी सांगताना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना अश्रू अनावर झाले. 2009 साली विधानसभा निवडणुकीवेळी जातीय दंगल भडकली. या निवडणुकीतही शरद पवार यांनी आपल्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर विश्वास दाखवून विधानसभेसाठी संधी दिली. या निवडणुकीत तब्बल 42 हजार मतांनी आपण विजयी झालो. शरद पवार यांनी आपल्यावर नेहमीच प्रेम आणि विश्वास दाखवला, या आठवणींना उजाळा देताना मात्र ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना यावेळी रडू कोसळले. मंत्री मुश्रीफ हे भावनिक झाल्याने सभागृहात देखील शांतता पसरली होती.
16:24 December 12
शरद पवार दोन वेळा पंतप्रधान होता-होता थांबले - प्रफुल पटेल
मुंबई - जे झाले नाही, तेही होऊ शकेल आणि देशात सर्वांनाच आनंद होईल, पुढील पाच वर्षांनी तरी शरद पवार पंतप्रधान व्हावेत, अशी आमची इच्छा आहे. पवार दोन वेळा पंतप्रधान होता-होता थांबले, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल म्हणाले.
16:06 December 12
म्हणूनच 'संपुआ'च्या अध्यक्ष पदापर्यंत त्यांचे नाव चर्चेत - एकनाथ खडसे
जळगाव- शरद पवारांचा प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण हा समाजाला प्रेरणा तर आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना उत्साह देणारा आहे. या देशात शरद पवार हे एकमेव असे नेते आहेत, ज्यांचे सर्वपक्षातील नेत्यांशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत. राजकारण म्हटले की तुझं तोंड इकडे, माझं तोंड तिकडे अशी परिस्थिती असते. पण देशातील छोटे पक्ष असोत किंवा मोठे पक्ष असोत, साऱ्यांशी सलोख्याचे संबंध वर्षानुवर्षे टिकवून ठेवण्याचे काम पवारांनी केले आहे. म्हणूनच संपुआच्या अध्यक्ष पदापर्यंत त्यांचे नाव चर्चेत आले. ही त्यांच्या कामाची पावती आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी शरद पवारांवर स्तुतीसुमने उधळली.
16:02 December 12
शरद पवार पंतप्रधान व्हायला हवे होते - संजय राऊत
नाशिक- शरद पवार पंतप्रधान व्हायला हवे होते, देशाचे नेतृत्व करण्याची सगळ्यात जास्त क्षमता त्यांच्याकडे होती. त्यांचे कर्तृत्व हाच त्यांना मोठा अडथळा ठरत गेला. कमकुवत लोकांनी त्यांना कायम अडगळीत टाकले, असे शिवसेना खासदार संजय राऊत येथे पत्रकार परिषदेत म्हणाले.
15:59 December 12
कोल्हापूर - शरद पवार यांच्या आजोळी वाढदिवस साजरा
कोल्हापूर - शरद पवार यांच्या आजोळी वाढदिवस साजरा गावकऱ्यांनी केक कापून साजरा केला पवारांचा वाढदिवस..
15:53 December 12
शरद पवार यांच्यासारख्या अनुभवी नेत्यांची देशाला गरज - मेमन
मुंबई- शरद पवार यांनी आपले सारे आयुष्य समाजकारण, राजकारण, कृषी आदी सेवेसाठी लावले. राज्यसभेत मी पवार यांच्यासमवेत सहा वर्षे काम केले. मधल्या सुट्टीच्या काळात पवारांकडे सर्वपक्षीय नेते येत असत आणि सल्ला घेत असत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि भाजपच्या अनेक नेत्यांच्या मनात शरद पवार यांच्यांबद्दल आदर आहे. शरद पवार यांच्यासारख्या अनुभवी नेत्यांची देशाला आज गरज आहे, असे राष्ट्रवादी नेते माजिद मेमन वाढदिवसाप्रसंगी म्हणाले.
14:49 December 12
शिवसेना आमदार प्रकाश आबिटकरांनी शरद पवार यांना दिल्या शुभेच्छा
कोल्हापूर- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्यसभा खासदार आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे मार्गदर्शक आदरणीय श्री. शरद पवार साहेब यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन, असे ट्विट करून राधानगरी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार प्रकाश आबिटकर यांनी शरद पवार यांना शुभेच्छा दिल्या.
14:13 December 12
शरद पवारांचे आजोळ गोलीवडेमध्ये देखील पवारांचा वाढदिवस जल्लोषात साजरा
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा आज वाढदिवस संपूर्ण महाराष्ट्रात साजरा होत आहे. त्यांच्या आजोळच्या मंडळींनी सुद्धा पवार यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला आहे. प्रत्यक्षात शरद पवार यांना भेटू शकत नसले तरी त्यांच्याबद्दल असलेले प्रेम गावकऱ्यांनी वाढदिवस साजरा करून व्यक्त केले आहे. कोल्हापुरातल्या पन्हाळा तालुक्यातील गोलीवडे हे शरद पवार यांचे आजोळ आहे.
13:06 December 12
माझे मित्र आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा असे म्हणत हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भुपेंद्र हुडा यांनी देखील शरद पवारांना शुभेच्छा दिल्या आहेत.
13:01 December 12
राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खासदार शरद पवार यांना उत्तम आयुरारोग्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना, असे म्हणत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी पवारांना शुभेच्छा दिल्या आहेत.
13:00 December 12
महाराष्ट्राला सदैव अग्रेसर मार्गावर ठेवणारे.. कला, क्रीडा, साहित्य, संगीत, राजकारण, समाजकारण या बरोबरच “जीवनकला” या सर्वात अतिशय मातब्बर असलेले अष्टांगपैलु दुरदर्शी कृषीतज्ञ
शरद पवार साहेंबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, अशा शब्दात अभिनेत्री आणि शिवसैनिक उर्मिला मातोंडकर यांनी पवारांना शुभेच्छा दिल्या आहेत
12:58 December 12
शरद पवारांचे वय मोजू नका; सगळे तरुण त्यांच्यापुढे फिके पडतील - संजय राऊत
शरदपवार साहेबांचं वय मोजू नये. सगळे तरुण त्याच्यापूढे फिके पडतील. अशाप्रकारचं काम ते आजही करत आहेत. त्यांच्याकडून आम्ही रोज प्रेरणा घेतो, पाच पिढ्या प्रेरणा घेत आहेत, त्यांच्या वयाचा हिशोब करणं हा त्यांच्यावर अन्याय आहे. ते सर्वसामान्यांना आधार आहेत, ते शतकपूर्ती करतील, असे गौरद्वागार व्यक्त शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.
12:57 December 12
शिवसेनेचे मुखपत्र सामनामधून शरद पवारांवर स्तुतीसुमने
शरद पवार म्हणजे हत्तीची चाल आणि वजिराचा रुबाब असलेले ८० वर्षाचे व्यक्तिमत्व आहे. मात्र, तरीही त्यांचे वय वाढले नाही असा उत्साह त्यांच्यामध्ये आजही दिसून येतो. पवार हे देशातील सर्वात अनुभवी नेते आणि यंशवतराव चव्हाण यांचे राजकीय आणि वैचारिक वारसादार आहेत. आज त्यांचा ८० वाढदिवस आहे. मात्र, पवार हे ज्येष्ठ आहेत की तरुण, अशा संभ्रमात देश पडला असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.
12:55 December 12
शरद पवार.. वयाच्या 80 व्या वर्षीही राज्यासह देशाच्या केंद्रस्थानी असलेले अलौकिक नेतृत्व
देशातील महत्त्वाचे आणि प्रगत राज्य आलेल्या महाराष्ट्राच्या राजकारणात एक वर्षापूर्वी राजकीय भूकंप घडून भल्या-भल्या राजकीय पंडितांनी विचारही केला नसेल, अशी आघाडी स्थापन होत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा समावेश असलेल्या सरकारचे नेतृत्व शिवसेनेकडे आले. देशाच्या पारंपरिक राजकारणाला अनोखे वळण देणारी आणि अक्षरशः चमत्कार वाटावी, अशी ही घटना आणि हा संपूर्ण राजकीय चमत्कार घडवून आणण्यात मुख्य भूमिका निभावत होते ते वयाच्या 80 व्या दशकात असलेले आणि जाणता राजा म्हणून ओळख असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार.
12:48 December 12
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनीही शुभेच्छा दिल्या आहेत. पवारांना दीर्घायुष्य मिळावी ही ईश्वराकडे प्रार्थना अशा शब्दात त्यांनी पवारांना शुभेच्छा दिल्या.
12:22 December 12
शरद पवारांना दिर्घायुष्य लाभो; पंतप्रधान मोदींनी पवारांना दिल्या वाढदिवासाच्या शुभेच्छा
मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज ८० वा वाढदिवस साजरा केला जात आहे. देशाच्या राजकारणात शरद पवारांचे दबदबा आजही कायम आहे. सर्वाधिक संसदीय कार्यकाळ पूर्ण करणारे नेते म्हणून शरद पवारांकडे पाहिले जाते. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये रक्तदान करण्याचे आवाहन राष्ट्रवादीकडून करण्यात येत आहे.
शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदी, नितीन गडकरी, संजय राऊत यासह देशपातळीवरील अनेक दिग्गज नेत्यांनी पवारांना शुभेच्छा दिल्या आहेत.