मुंबई -राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (रविवारी) आपला बारामती येथे ठरलेला नियोजित दौरा रद्द केला. यामुळे ते पुण्याहून मुंबईला निघाले आहेत. पवार यांनी अचानक दौरा रद्द केल्याने याविषयी पुन्हा एकदा राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
पार्थ पवार यांच्यावरुन सुरू झालेल्या राजकीय वादळानंतर आज पवार कुटुंबीयांचा एकत्रित कार्यक्रम बारामती येथे ठरला होता. त्यासाठीच शरद पवार हे दुपारी पुण्यात पोहोचले हेाते. त्यानंतर ते चार वाजता बारामतीला जाणार होते. मात्र, मध्येच बारामतीचा दौरा रद्द करून ते मुंबईकडे निघाले. याविषयी पवार कुटुंबियातील नाराजीवर राजकीय क्षेत्रात चर्चा सुरू झाल्या आहेत.
दरम्यान, मागील काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यावरून राष्ट्रवादीत बरेच गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. पार्थ यांनी जाहीर केलेल्या राममंदिर आणि सुशांतसिंह प्रकरणावरील भूमिकेमुळे राष्ट्रवादीत नाराजी पसरली होती. त्यामुळेच शरद पवार यांनी यावर पडदा टाकण्यासाठी पार्थ यांच्या विधानाला कवडीचीही किंमत नाही, असे सांगत पार्थ यांना फटकारले. त्यावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार हे नाराज झाले असल्याचे बोलले जात होते. त्यामुळे ही नाराजी दूर करण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबईतील सिल्व्हर ओक बंगल्यावर पार्थ पवार यांना बोलावून त्यांची मनधरणी केली होती. मात्र, त्यानंतरही वातावरण शांत झाले नसल्याने पवार यांनी आज आपला बारामतीचा दौरा रद्द केला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, सुप्रिया सुळे यांच्याकडून करण्यात आलेल्या मनधरणीनंतरही पार्थ पवार यांची भूमिका बदलली नसल्याने याविषयी पवार कुटुंबियांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. त्यामुळेच पवारांनी बारामतीला जाणे टाळले असल्याची चर्चा राजकीय वतुर्ळात सुरू झाली आहे.