मुंबई - राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. शरद पवार म्हणाले की, मी आता पुन्हा निवडणुकीला उभा राहणार नाही. कुठेतरी थांबायचा विचार केला पाहिजे. त्यांच्या या घोषणेनंतर शरद पवार व त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांना अश्रू अनावर झाले.
निवृत्तीची घोषणा करताना शरद पवार काय म्हणाले?- 1 मे 1960 ते 1 मे 2023 इतक्या प्रदीर्घ कालावधीनंतर कुठेतरी थांबायचा विचारसुद्धा केला पाहिजे. माणसाला अधिक मोह असू नये, आणि इतकी वर्ष संधी मिळाल्यानंतर आणखी मोह ठेवण्यासंबंधीची भूमिका मी काही कधी घेणार नाही. त्यामुळे तुम्हाला अस्वस्थता कदाचित वाटेल, पण मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त व्हायचा निर्णय आज घेतलेला आहे, असे शरद पवार निवृत्तीची घोषणा करताना म्हणाले.
कार्यकर्ते रडले - राष्ट्रवादीचे अध्यक्ष कोण होणार हे ठरविण्यासाठी समितीची स्थापना करावी, अशी सूचना शरद पवार यांनी केली आहे. ही समिती राजकीय वारसदार ठरवेल, असे पवार यांनी म्हटले आहे. निवृत्ती जाहीर केली असली तरी सहकार, सांस्कृतिक व क्रीडा यामध्ये अधिक काम करणार आहे. समाजातील कमकुवत घटक, युवक-युवती व विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणार असल्याचे जाहीर केले आहे. शरद पवारांच्या निर्णयानंतर अनेक कार्यकर्त्यांना रडू कोसळले आहेत.
तुम्हीच आमचे कमिटी-जयंत पाटील यांना बोलताना रडू कोसळले. त्यांनी हुंदका आवरत देशाला तुमच्या अनुभवाची गरज असल्याचे सांगितले. पक्षात जे काही बदल कराल, ते मंजूर असल्याचेही सांगितले. छगन भुजबळ यांनीदेखील निवृत्तीचा निर्णय मागे घेण्याची मागणी केली आहे. कमिटी नियुक्तीचा निर्णयदेखील नामंजूर असल्याचे सांगितले. तसेच तुम्हीच आमचे कमिटी आणि सर्व काही असल्याचे सांगितले. पक्ष कार्यकर्त्यांनीही कमिटी नामंजूर असल्याचे हात वर करून सांगितले आहे.