मुंबई -राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारयांच्यावर बुधवारी शस्त्रक्रिया होणार होती. मात्र, आज त्यांच्या पोटात दुखू लागल्याने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुढच्या तपासण्या व औषधोपचार इथेच होणार असून परिस्थिती बघून शस्त्रक्रियेबाबतचा निर्णय डॉक्टर घेतील, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.
पोटात दुखू लागल्याने एक दिवस आधीच शरद पवार ब्रीच कँडीत दाखल - शरद पवार लेटेस्ट न्यूज
अचानक पोटात दुखू लागल्यामुळे शरद पवारांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना बुधवारी दाखल करण्यात येणार होते. याच दिवशी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. पण आजच (मंगळवार) पोटात दुखू लागल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
शरद पवारांच्या 29 मार्चला पोटात दुखू लागल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी डॉक्टरांनी त्यांची तपासणी केल्यानंतर त्यांना पित्ताशयाचा त्रास असल्याचे निदान झाले. 31 मार्चला शरद पवारांवर एण्डोस्कोपी आणि शस्त्रक्रिया केली जाणार होती. आज सकाळी ते डॉक्टरांच्या सल्ल्याने घरी परतले आणि उद्या सकाळी ते शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल होणार होते. मात्र, दुपारी अचानक त्यांच्या पोटात दुखू लागल्याने त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. मात्र, त्यांच्यावर शास्क्रिया ही उद्या करण्यात येईल किंवा आज याचा निर्णय डॉक्टर घेतील अशी माहिती देण्यात आली आहे.