मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. गेल्या दीड महिन्यात शरद पवार तिसऱ्यांदा उद्धव ठाकरे यांच्या भेटीला वर्षा बंगल्यावर गेले. त्यामुळे ठाकरे आणि पवार यांमध्ये दडलंय काय? अशी जोरदार चर्चेला उधाण आले आहे.
गुरूवारी सह्याद्री अतिथिगृहावर महत्त्वपूर्ण बैठक पार पडल्यानंतर शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्यावर मोर्चा वळवला. दोघांमध्ये तब्बल तासभर चर्चा झाली. या भेटीमुळे उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले स्वबळाचा नारा देत आहेत. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि सरकारचे काय? केंद्रिय तपास यंत्रणाही आघाडीतील नेत्यांच्या मागे सक्रिय झाल्या आहेत. यासर्व प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी पवार मुख्यमंत्री ठाकरे यांना भेटले असावेत, असा कयास राजकीय विश्लेषकांचा आहे.
संसदेच्या आगामी अधिवेशनावर चर्चा
येत्या १९ जुलैपासून संसदेचे अधिवेशन सुरु होत आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना-राष्ट्रवादीची भूमिका आणि मुद्दे काय असावेत, यावर दोघांमध्ये चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षणाचा मुद्दा न्यायालयाने केंद्राच्या अखत्यारीत ठेवला आहे. यावरून केंद्राची कोंडी कशा पद्धतीने करता येईल, याबाबतची चर्चा झाली असावी, असे देखील म्हटलं जात आहे.