पुणे :Sharad Mohol murder case : गँगस्टर शरद मोहोळ खून प्रकरणी मोठी माहिती ही समोर आली आहे. गुन्हे शाखेनं मध्यरात्री गुंड विठ्ठल शेलारसह सहा जणांना पोलिसांनी नवी मुंबई येथून ताब्यात घेतले आहे. त्यामध्ये रामदास मारणे, विठ्ठल शेलार या दोघांचा त्यामध्ये समावेश आहे. तर, पुण्यातून चौघांना पकडण्यात आले आहे. आतापर्यंत शरद मोहोळ खून प्रकरणात 14 जणांना अटक करण्यात आली आहे.
नवी मुंबईतून अटक : 5 जानेवारी रोजी पुण्यातील कोथरूड येथील सुतरदारा येथे गँगस्टर शरद मोहोळ याच्यावर त्याचे साथीदार मुन्ना पोळेकर आणि नामदेव कानगुडे यांनी गोळ्या झाडून खून केला. त्यानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या या आरोपींना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने पाठलाग करून अटक केली. शरद मोहोळ खून प्रकरणाचा तपास सुरू असताना आरोपी रामदास मारणे नवी मुंबई परिसरातील एका फार्म हाऊसवर असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. सूत्राच्या माहितीनुसार पोलिसांच्या पथकानं त्याला नवी मुंबईतून अटक केली आहे.
मोक्का अंतर्गत कारवाई : विठ्ठल शेलार हा मुळशी तालुक्यातील बोतरवाडी येथील आहे. यापूर्वी तो पुणे शहरातील गणेश मारणे टोळीसाठी वसुली करत होता. मुळशी येथे दोघांचा जाळून खून केल्यानंतर विठ्ठल शेलारच्या दहशतीचा नवीन अध्याय सुरू झाला. पिंटू मारणे याचा खून केल्यानंतर त्याने स्वतःची दहशत निर्माण केली होती. त्याच्यावर नऊ गंभीर गुन्हे दाखल असून सन 2014 मध्ये त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती.
शरद मोहोळला कसा संपवला? : दरम्यान, शरद मोहोळ याची 5 जानेवारी 2024 ला दुपारी दीडच्या सुमारास हत्या झाली. मोहोळचा साथीदार मुन्ना पोळेकर याने त्याच्यावर पाठीमागून गोळीबार केला होता. आधीच आपले दोन साथीदार त्याने बाहेर ठेवले होते. मोहोळसोबत बाहेर पडताच त्याने पहिली गोळी चालवली. त्यानंतर त्याच्या साथीदारांनी गोळ्या मारत मोहोळ याला जागीच ठार केलं. पुण्यात या हत्येमुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. आरोपींना पोलिसांनी त्याच रात्री शिरवळदरम्यान पकडत अटक केली होती.