मुंबई Shambhuraj Desai On Uddhav Thackeray: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी अपशब्द वापरला आहे. जर अशा पद्धतीने ते अपशब्द वापरणार असतील तर आम्हालाही जसास तसं तीव्रतेनं बोलावं लागेल असं प्रत्युत्तर मंत्री शंभूराज देसाई यांनी दिलं आहे. तसंच त्यांच्या असंसदीय शब्दाबाबत कारवाई करणं शक्य आहे का? याबाबत आम्ही पोलीस आणि कायदेतज्ञांशी चर्चा करत असल्याचंही त्यांनी सांगितलं. देसाई आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. राज्यातील एकाही शेतकऱ्याला नुकसानीच्या मदतीपासून वंचित ठेवणार नाही. अवकाळी पावसाची तालुका निहाय आकडेवारी गोळा करण्याचं काम सुरू असल्याचंही देसाई यांनी सांगितलं.
शेतकऱ्यांच्या बांधावर जायला सवड नाही: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात बोलताना, राज्यामध्ये अवकाळी पावसानं शेतकरी त्रस्त असताना मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचाराला परराज्यात जात आहेत. त्यांना शेतकऱ्यांच्या बांधावर जायला सवड नाही, अशा शब्दात टीका केली होती. उद्धव ठाकरे यांच्या या विधानाबद्दल विचारले असता शंभूराज देसाई म्हणाले की, जर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शेजारील राज्याने प्रचारासाठी आदराने बोलावलं असेल आणि आम्ही महायुतीतला घटक पक्ष असल्यानं प्रचारासाठी जाणं चुकीचं नाही. मुख्यमंत्री केवळ एका दिवसासाठी तेलंगाणामध्ये गेले आहेत, ते पुन्हा रात्री महाराष्ट्रात परतणार आहेत.