मुंबई:विनायक राऊत यांना भविष्य समजते का? त्यांना चेहऱ्यावरून भविष्य कळते का? खासदार विनायक राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेले 9 खासदार संपर्कात असल्याचा दावा केल्यानंतर शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सातत्याने ठाकरे गटाला अनेक धक्के :शिंदे गटाचे नेते व गृहमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, की विनायक राऊत यांनीही माझ्याबाबत असेच विधान केले आहे. मी त्यांना दोन दिवसांचा वेळ दिला. मी माझ्या कायदेशीर सल्लागाराशी बोललो असून त्यानुसार कारवाई करणार आहे. त्यांनी माझ्याविरुद्ध केलेले वक्तव्य मागे घ्यावे. अन्यथा त्यांनी कायदेशीर कारवाईसाठी स्वत:ला तयार ठेवावे, असा इशारा दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही चांगले काम करत आहोत. विनायक राऊत अशा गोष्टी बोलत राहतात, आम्ही त्यांच्याकडे लक्ष देत नाही. राज्यातील सत्तास्थापनेनंतर शिंदे गटाने सातत्याने ठाकरे गटाला अनेक धक्के दिले आहेत. ठाकरे गट अद्याप या धक्क्यातून सावरलेला नाही.
काय म्हणाले होते राऊत :उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार विनायक राऊत यांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना शिंदे गटाच्या आमदार, खासदारांबाबत खळबळजनक दावा केला होता. शिंदे गटाचे 22 आमदार, 9 खासदार संपर्कात असल्याचे विनायक राऊत यांनी म्हटले होते. राऊत यांनी आपली बाजू मांडताना आरोग्यमंत्री तानाजी सावंत, मंत्री शंभूराज देसाई, खासदार गजानन कीर्तिकर यांची नावे घेतली होती. आमदार, खासदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात असल्याचे विनायक राऊतंचं वक्तव्य पूर्णपणे खोटं असल्याचं शंभूराज देसाई यांनी म्हटलं आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी राऊत यांना दोन दिवसांत वक्त्यव्य मागे घ्या अन्यथा कारवाईला तयार रहा असा इशारा देसाई यांनी दिला आहे. शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत पालकमंत्री देसाई बोलत होते.