मुंबई : राज्यातील पत्रकारांच्या एकंदरीत समस्यांबाबत आमदार धीरज लिंगाडे यांनी लक्षवेधी मार्फत सभागृहाचे लक्ष वेधले. याप्रसंगी बोलताना ते म्हणाले की, राज्यातील एकूण पत्रकारांची संख्या ही जवळपास ८ हजार ५०० इतकी आहे. त्यापैकी एक हजार पत्रकारांना २० हजारापासून दीड लाखापर्यंत पगार मिळतो. तर उर्वरित पत्रकारांना २० हजार महिना पगारावर निभावावे लागते, असे वाईस ऑफ मीडियाने केलेल्या सर्वे मधून निष्पन्न झाले आहे. करोना काळात १५० पत्रकारांना आपला जीव गमवावा लागला. पत्रकारांना बँकांमधून कर्ज उपलब्ध होत नाही. पत्रकारांना कुठलेही संरक्षण नाही. पत्रकारांना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या धर्तीवर, पत्रकार कल्याणकारी महामंडळ स्थापन करावे अशी मागणीही लिंगाडे यांनी केली आहे.
डिजिटल मीडियाला अधीस्वीकृती : या प्रश्नावर बोलताना शिंदे गटाच्या आमदार मनीषा कायंदे यांनी सांगितले आहे की, डिजिटल मीडियालासुद्धा अधीस्वीकृती देण्यात यावी. याबाबत योग्य ते निकष ठरवावेत. त्याचप्रमाणे केंद्र सरकारच्या धर्तीवर सुविधा देण्यात याव्यात अशी मागणी, मनीषा कायंदे यांनी केली. तर राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी शंकराव चव्हाण सुवर्ण महोत्सव पत्रकार योजनेमध्ये असलेला ५० कोटींचा निधी हा २०० कोटीपर्यंत वाढवण्यात यावा अशी मागणी केली.