मुंबई: राज्यातील उद्योग धंदे परराज्यात पळवले जात आहेत. (Shambhuraj Desai On film industry ) आता मुंबईतील चित्रपट सुष्टी देखील हलवण्याचा खटाटोप सुरु असल्याचा आरोप काँग्रेसचे सदस्य अभिजीत वंजारी विधानपरिषदेत (Congress Member Abhijit Vanjari) केला आहे. सरकारकडून शंभूराज देसाईंनी (Shambhuraj Desai) आरोपाला प्रत्युत्तर दिले आहे. मुंबईतील चित्रपटसृष्टीबाबत आयुक्तांनी काढलेल्या नोटीस तपासून कार्यवाही केली जाईल. मात्र, चित्रपटसृष्टी महाराष्ट्राबाहेर जाऊ देणार नाही, अशी ग्वाही मंत्री देसाई यांनी दिली.
महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरात राज्यात: सत्तांतर झाल्यानंतर राज्यातील उद्योग- धंदे, व्यापार परराज्यात जाण्याची व्यापी वाढली आहे. फॉक्सकॉन, वेदांता पाठोपाठ चित्रपटसृष्टी परराज्यात नेण्याचा प्रयत्न सुरु आहेत. प्रश्नोत्तराच्या तासाला सदस्य अभिजित वंजारी यांनी ‘गुजरातच्या निवडणुकीमुळे महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरात राज्यात गेले, त्यामुळे महाराष्ट्रातील तरुणांचा रोजगार बुडत आहे. आता मुंबईतील आयुक्तांनी ‘बॉलिवूड’ अर्थात चित्रपटसृष्टीला तेथील उद्योग बंद करण्याची नोटीस काढली. तुम्ही ते गुजरातला नेणार आहात का ? असा प्रश्न उपस्थित केला होता.
३ प्रकल्पांना मान्यता देण्यात आली:मंत्री देसाई यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. मंत्री देसाई म्हणाले की, राज्यात शिंदे सरकार सत्तेवर आल्यानंतर चुकीची माहिती दिली जात आहे. त्यावर शासनाकडून खुलासा होणे अपेक्षित आहे. त्यानुसार शिंदे-फडणवीस यांचे सरकार येण्याच्या अगोदर एकही हाय पॉवर समितीची बैठक झाली नाही. टाटा एअर बस, फॉक्स वेदांता यांच्यासह अन्य प्रकल्प हे तत्कालीन महाविकास आघाडीच्या नाकर्तेपणामुळे राज्याच्या बाहेर गेले. शिंदे- फडणवीस यांचे सरकार आल्यावर ६२ हजार ३५६ कोटी रुपयांच्या ३ प्रकल्पांना मान्यता देण्यात आली. अनेकांना यामुळे रोजगार मिळणार आहे. मुंबईतील चित्रपट सृष्टीला कोणत्या कारणासाठी आयुक्तांनी नोटीस काढली आहे, त्याची माहिती घेऊ आणि मुंबईतील चित्रपटसृष्टी महाराष्ट्राच्या बाहेर जाऊ देणार नाही, असे उत्तर मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत दिले आहे.
वंजारी आणि दरेकरांमध्ये हमरीतुमरी: परराज्यातील निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील उद्योग धंदे पळवले जात असल्याचे विधान अभिजीत वंजारी यांनी केले आहे. गुजरात निवडणुकीचा उल्लेख होताच, भाजपचे सदस्य प्रवीण दरेकरांनी आक्षेप घेतला. दोघांमध्ये हमरीतुमरी झाली. दोघेही हातघाईला आले आहे. मुख्यमंत्र्यांसमोरच हा प्रकार सुरु होतो. सभापती नीलम गोऱ्हे यांनी यावर दोघांनाही दटावत, वादावर तोडगा काढला.