मुंबई :दरवर्षी २ जून हा आंतरराष्ट्रीय सेक्स वर्कर डे म्हणून साजरा केला जातो. तसे पाहिले तर जगभरात सेक्स वर्करची सामाजिक स्थिती सारखीच आहे. बऱ्याचदा त्यांना वेश्याव्यवसायाच्या दुनियेत ढकलले जाते. किंवा ते स्वतःच्या इच्छेने सुद्धा येतात. पण त्यांना या दलदलीतून बाहेर पडण्यासाठी समाजाच्या सकारात्मक भूमिकेची गरज महत्त्वाची असते. म्हणूनच संपूर्ण जगभरात सेक्स वर्कर्सच्या हक्कांसाठी, जागरुकता अभियानांतर्गत २ जून रोजी आंतरराष्ट्रीय सेक्स वर्कर डे साजरा केला जातो, हा त्याचा उद्देश आहे.
व्यक्तीच्या जगण्याचा पेशा :सेक्स वर्कर्स संबंधात काम करणाऱ्या वेगवेगळ्या संस्था आणि यंत्रणांकडे असलेल्या माहितीच्या आधारे भारतात किमान ३० लाख मुली, महिला शरीरविक्रयाच्या बाजारात असून त्या आपल्या वाट्याला आलेले आयुष्य जगत आहेत, असा एक सर्वमान्य अंदाज आहे. ही संख्या अधिकची ही असू शकते. भारतात कुंटनखान्यांपासून ते पंचतारांकित हॉटेलांपर्यंत, खासगी फ्लॅटपासून ते बकाल झालेल्या लॉजपर्यंत, स्पा/हेल्थ क्लबच्या नावाखाली ते अगदी रस्त्यापर्यंत आणि वरवर लक्षातही येणार नाही अशा अवगुंठीत परिसरात शरीरविक्रयाचे बाजार चालू असतात. शरीरविक्रयाचा बाजार हे एक समांतर असे जग आहे. याला फारशी किंमत, पत आणि सहानुभूती नसते. अशा या पत नसलेल्या जगाविषयी नेहमीच बोलले जाते. परंतु त्यांच्या हक्का विषयी त्यांच्या कर्तव्य विषयी जास्त चर्चा होत नाहीत.
स्वइच्छेने हा पेशा करणाऱ्यावर कारवाई करू नये :शरीरविक्रय करणे हा त्या व्यक्तीच्या जगण्याचा पेशा असला तरी त्या व्यक्तीलाही इतरांप्रमाणे सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. हे लक्षात घेऊन स्वतःच्या इच्छेने हा पेशा करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करू नये, ही माफक अपेक्षा असते. परंतु बऱ्याचदा तसे होताना दिसत नसल्याने नाहक शरीरविक्रि करणाऱ्या या व्यक्तींना मोठ्या जाचाला सामोरे जावे लागते. स्वमर्जीने हा पेशा करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करू नये, असे मध्यंतरी एका खटल्यात न्यायालयाने म्हटले आहे. तसेच हा आदेश सर्व राज्यांतील, तसेच केंद्रशासित प्रदेशांतील पोलिसांना लागू असल्याचे सांगितल्याने मोठ्या प्रमाणात या निर्णयाचे अनेक स्तरांतून स्वागत झाले. परंतु त्याचे विविध अर्थही लावले गेले.