मुंबई: शिवडी-न्हावा शेवा सागरी सेतू हा मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प म्हणूनही ओळखला जातो. भारतातील सर्वात लांब म्हणून ओळखला जाणारा शिवडी-न्हावा शेवा सी लिंक प्रकल्प मे महिना अखेर पुर्ण होणार आहे. २२ किलोमीटर लांबीच्या या सी लिंकचे ९० टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाल्याची माहिती मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाकडून मिळाली आहे.
एक मैलाचा दगड गाठणार: शिवडी-न्हावा शेवा पुलावरील ७० ओर्थो ट्रॉपिक स्टील डेक स्पॅन पैकी केवल शेवटचे तीन डेक बसवणे बाकी असून, मे महिन्याच्या शेवटपर्यंत हे सर्व डेक बसविण्यात आल्यानंतर हा पूल पूर्णपणे जोडला जाणार आहे. त्याचसोबत शिवडी इंटरचेंजचे कामही मे महिन्याच्या शेवटी पूर्ण होणार आहे. संपूर्ण मुंबईकरांचे लक्ष या प्रोजेक्टकडे लागले आहे. देशातील समुद्रमार्गावरील सर्वात जास्त लांबीचा हा पहिला प्रकल्प मुंबई तयार होत असल्याने, त्याचा आनंदही फार मोठा असल्याचे एमएमआरडीएचे आयुक्त आर श्रीनिवास यांनी सांगितले आहे. तसेच या प्रकल्पाचे कामही अतिशय जलद गतीने हाती घेण्यात आले. हा प्रकल्प मुंबई तसेच नवी मुंबई कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. यामुळे मुंबई शहरातील रहदारीही कमी होईल त्यासोबत नवी मुंबईच्या विकासात सुद्धा मोठ्या प्रमाणात भर पडेल, असेही श्रीनिवास यांनी म्हटले आहे.
प्रकल्पाचा खर्च वाढला: मुंबईला रायगड जिल्ह्यासोबत जोडणाऱ्या या सागरी मार्गाची संकल्पना सर्वात अगोदर १९६३ साली सुचविली गेली. परंतु महाराष्ट्र शासनाने ह्या प्रकल्पामध्ये सुरुवातीस जास्त काही स्वारस्य दाखविले नाही. त्याचप्रमाणे राजकीय रस्सीखेचीमुळे हा प्रकल्प रखडला होता. अखेर २०१२ साली केंद्रीय पर्वावरण मंत्रालयाने ह्या प्रकल्पास मंजूरी दिली. हा प्रकल्प ३५ वर्षांपूर्वी आखण्यात आला असला तरी, प्रत्यक्षात बांधकाम एप्रिल २०१८ मध्ये सुरू झाले. हा प्रकल्प जायका अर्थात जपान आंतरराष्ट्रीय सहकार संस्थेच्या (JICA) कर्ज सहाय्याने राबविण्यात येत आहे. या पुलाच्या बांधकामाचा एकूण खर्च १७,८४३ कोटी रुपये आहे. सुरुवातीस ११ हजार कोटीचा असणारा हा प्रकल्प आता तब्बल ८ हजार कोटींने वाढला आहे. पुलाच्या पायाचे आणि स्तंभांच्या उभारणीचे काम प्रगतीपथावर असून ते अंतिम टप्प्यात आहे.
अतिशय महत्त्वाचा उड्डाणपूल: आताच झालेल्या मुंबईतील वाहतुकीच्या सर्वेक्षणातील आकड्यानुसार शिवडी-न्हावा शेवा सी लिंक वापरणाऱ्या वाहनांची अंदाजे संख्या बघितली तर, मुख्य पुलावरील दररोजची वाहतूक ३९ हजार ३०० पेक्षा जास्त आहे. शिवाय, या सी लिंकवरील वाहतूक २०३२ पर्यंत १ लाख ३ हजार ९०० पर्यंत आणि २०४२ पर्यंत १ लाख ४५ हजार ५०० पर्यंत वाढण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. या आकड्यांवरून हे समजते शिवडी - नाव्हाशेवा हा उड्डाणपूल मुंबई आणि नवी मुंबईच्या वाहतुकीच्या दृष्टीने किती महत्त्वाचा ठरेल.