मुंबई - कोरोना विषाणूने गेल्या सात महिन्यांपासून देशात धुमाकूळ घातला आहे. असे असतानाही नागरिक या आजाराबाबत गंभीर नसल्याची चिंताजनक आणि धक्कादायक माहिती समोर येत आहे. कोरोनाची लक्षणे असूनही अनेक जण मेडिकलमधून सर्दी-तापाची औषधे आणून ती घेत आहेत. अशी मनाने औषधे घेणे आता अनेकांना महागात पडत आहे. कारण सर्दी-तापाच्या पाचव्या किंवा सहाव्या दिवशी अशा अनेक रुग्णांची ऑक्सिजन पातळी खालावत असून त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागत आहे. यातील अनेकजणांची स्थिती गंभीर होऊन त्यांच्या जीवाला धोका निर्माण होत असल्याची माहिती बीकेसी कोविड सेंटरचे अधिष्ठाता डॉ. राजेश ढेरे यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिली. सरकारच्या मार्गदर्शक तत्वानुसार लक्षणे दिसल्याबरोबर नागरिकांनी डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.
कोरोनावर अद्याप लस मिळालेली नाही. पण, वेळेत या आजाराचे निदान झाले आणि उपचार झाले तर जीवघेण्या आजारावर सहज मात करता येते याची लाखो उदाहरणे आहेत. मुंबईत दररोज दीड ते अडीच हजार रुग्ण आढळत आहेत. तरीही अनेक जण, त्यातही तरुण पिढी याबाबत गंभीर नाही. मुळात आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली आहे, आपण तरुण आहोत, आपल्याला काहीही होणार नाही, या गैरसमजातून तरुण पिढी मोठ्या संख्येने बाहेर फिरत आहे. यावेळी मास्क न लावणे, फिजिकल डिस्टन्सिंग न पाळणे या गोष्टीही होत आहेत. त्यामुळे आता 30 ते 40 वयोगटातील रुग्ण वाढत आहेत. या वयोगटातील लोकं कोरोनाची लक्षणे दिसूनही रुग्णालयात जाण्याऐवजी मेडिकलमधून औषधे आणून ती घेत आहेत. पॅरासिटेमॉलपासून अगदी प्रतिजैविकेही (अँटिबायोटिक) घेत आहेत. मात्र, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ही औषधे घेतली जात असून ती परिणामकारक ठरत नाहीत. त्यामुळे पाचव्या-सहाव्या दिवशी अशा रुग्णांची तब्येत खालावत आहे. त्यांच्या शरीरातील ऑक्सिजन पातळी खूपच कमी होत आहे. कोविड सेंटर आणि हॉस्पिटलमध्ये सध्या अशा रुग्णांची संख्या वाढत असून ही गंभीर बाब असल्याचे डॉ. ढेरे यांनी सांगितले.
अशा रुग्णांची संख्या 31 टक्के?