मुंबई -विधीमंडळ अधिवेशनाच्या सातव्या दिवशी विजय विजय वडेट्टीवार यांची विधानसभा विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. यासंबंधीत घोषणा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केली. याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वडेट्टीवारांचे अभिनंदन केले.
विधिमंडळ अधिवेशनाच्या सातव्या दिवशी विरोधक बॅकफूटवर गेल्याचे चित्र आहे, तर सत्ताधाऱ्यांचे आत्मबल वाढले आहे. दोन दिवसाच्या सुट्टीनंतर विधीमंडळाचे कामकाज सुरू झाले आहे. आज अर्थसंकल्पीय चर्चेच्या माध्यमातून कामकाज पूर्ण होण्याकडे सरकारचा कल आहे.
विधानसभेमध्ये प्रश्नोत्तराचा तास पार पडला. यावेळी अजित पवारांना मुरुड येथील पॅरासेलिंगच्या दुर्घटनेबाबत प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले याठिकाणी पॅरासेलिंगची परवानगी नाही. मात्र, पोलीस आणि महसूल खात्याचे अधिकारी पैसे खाऊन परवानगी देतात. अशा आरोपींवर साधा गुन्हा न दाखल करता सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी अजित पवारांनी केली.
विधान परिषदेमध्ये उपसभापती निवडणुकीसाठी शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे यांचे नाव निश्चित होणार आहे. विधिमंडळामध्ये आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची बैठक पार पडणार आहे. या बैठकीदरम्यान सर्व आमदारांना आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रोत्साहनपर भाषणे आणि मार्गदर्शन केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेत सरकारने ६०० कोटी रुपये पाठवले आहेत. बँकेने त्यापैकी ५०० कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले नाही. या बँकेवर कारवाई करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी पाठवला आहे. मात्र, आता सरकार या बँकेवर कशा प्रकारची कारवाई करणार? असा प्रश्न छगन भुजबळ यांनी उपस्थित केला. त्यावर सहकारमंत्री म्हणाले बँकेवर प्रशासक नेमलेला आहे. कर्जमाफीचे पैसे दुसरीकडे वळवले असल्यास कारवाई करणार आहे. तसेच नागपूरमध्ये रामदेव बाबा विद्यापीठ सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी विधानसभेत निधी मंजूर करण्यात आला.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अर्थसंकल्पीय चर्चेला सुरुवात केली आहे. जीएसटीमधून देश अजूनही सावरला नाही. त्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून अपेक्षा होती की, मोठे उद्योगधंदे आणून रोजगार निर्मिती करावी. मात्र, ते केलेले नाही. तसेच कर्जमाफी करण्याची मागणीही करण्यात आली. कर्जमाफीमुळे बँकांचा फायदा होतो. शेतकऱ्यांना फायदा होत नाही, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफी करण्यास नकार दिला. मात्र, पंतप्रधान मोदींच्या सुचनेनंतर कर्जमाफी केली. आता त्यामधून किती शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली हा एक प्रश्नच असल्याचे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.