मुंबई :मुंबई महानगरपालिकेमध्ये कोरोना महामारीच्या काळामध्ये व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर पार्थिव, डेड बॉडी बॅगमध्ये टाकून त्याची विल्हेवाट लावली जात होती. या बॅग खरेदीमध्ये घोटाळा झाल्याचा गुन्हा किशोरी पेडणेकर यांच्यावर दाखल आहे. त्यासंदर्भात सत्र न्यायालयामध्ये शुक्रवारी किशोरी पेडणेकर यांच्याकडून अटकपूर्व जामिन मिळण्यासाठी तातडीची याचिका दाखल करण्यात आली. यासंदर्भात झालेल्या सुनावणीत त्यांना 24 ऑगस्टपर्यंत अटकेपासून संरक्षण दिलेले आहे.
चढ्या दराने शेकडो डेड बॉडी बॅग खरेदीचा आरोप :कोरोना महामारीच्या काळात मुंबईमध्ये शेकडो नागरिकांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामध्ये मृत झालेल्या व्यक्तींची डेड बॉडी बॅगमध्ये ठेवली जात होती. त्यांची बॅगमधूनच विल्हेवाट लावली जात होती. त्या डेड बॉडी बॅगची किंमत मूळ किमतीपेक्षा अधिक लावली जात होती. 1300 रुपये किंमतीची बॉडी बॅग 6800 ला विकल्याचा आरोप आहे. अशा चढ्या दराने शेकडो बॅग खरेदी केल्याचा आरोप आहे, किशोरी पेडणेकर यामध्ये सहभागी असल्याचे मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेचे म्हणणे आहे.
मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त आरोपी :आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेल्या गुन्ह्यात तत्कालीन अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांचेही आरोपी म्हणून नाव आहे. एकूण चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये किशोरी पेडणेकर, तत्कालीन अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू आणि खरेदी विभागाचे उपायुक्त रमाकांत बिरादर व वेदांत इंनोटेक लिमिटेड यांची आरोपी म्हणून नावे एफआयआरमध्ये नोंदविलेली आहेत.
किशोरी पेडणेकर यांचा न्यायालयामध्ये दावा :मात्र किशोरी पेडणेकर यांनी सत्र न्यायालयामध्ये दावा केला की, माझ्यावर केवळ खोटा आरोप केला जात आहे. या खरेदी व्यवहारांमध्ये माझा काही संबंध नाही, तर आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीने यामध्ये किशोरी पेडणेकर याशिवाय इतर आरोपी यांचा संबंध असल्याचा दावा केला होता. सत्र न्यायालयाने दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेतली. न्यायालयाने त्यांना अटकेपासून संरक्षण देत 24 ऑगस्टपर्यंत दिलासा दिलेला आहे.
हेही वाचा :
- Covid Center Scam Case : कोविड सेंटर घोटाळा प्रकरण; अखेर किशोरी पेडणेकरांवर गुन्हा दाखल
- Kishori Pednekar: एसआरए घोटाळ्याप्रकरणी किशोरी पेडणेकर यांना उच्च न्यायालयाचा 11 जूनपर्यंत दिलासा
- Kirit Somaiya Allegation: पेडणेकर यांना बेनामी मालमत्ता प्रकरणाचा जबाब द्यावा लागेल; किरीट सोमैय्यांचा आरोप