मुंबई : सीएसएमटी येथील भानुशाली या उपकरप्राप्त इमारतीचा भाग आज दुपारी कोसळला. ही इमारत धोकादायक झाल्याने मालकाला दुरुस्तीसाठी म्हाडाकडून परवानगी देण्यात आली होती. पण ही दुरुस्ती रखडली होती. त्यादरम्यान ही दुर्घटना झाली आहे. आतापर्यंत ज्या काही उपकरप्राप्त इमारती कोसळल्या, त्यातील अनेक इमारती या म्हाडाच्या डेंजर्स, अतिधोकादायक इमारतीच्या यादीत नव्हत्या. त्यानुसार भानुशाली इमारत उपकरप्राप्त होती, पण ती अतिधोकादायक इमारतीच्या यादीत नव्हती. त्यामुळे अतिधोकादायक इमारतीच्या यादीत नसलेल्या इमारती कोसळण्याची मालिका सुरुच आहे. तर, यामुळे अतिधोकादायक इमारतीच्या सर्व्हेक्षणावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
मुंबईत अंदाजे 16 हजार उपकरप्राप्त इमारती आहेत. या सर्व इमारतीचा शक्य तितक्या लवकर पुनर्विकास होणे गरजेचे आहे. पण विविध कारणांमुळे हा पुनर्विकास रखडला आहे. तर, या इमारतीच्या दुरुस्तीची जबाबदारी म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळावर आहे. त्यानुसार पावसाळ्यापूर्वी दरवर्षी या इमारतीचे सर्वेक्षण करत अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर केली जाते. अशा इमारती पावसाळ्यात कोसळण्याची शक्यता अधिक असल्याने या इमारतीतील रहिवाशांना स्थलांतरीत करत इमारती रिकाम्या केल्या जातात.
मात्र, गेल्या काही वर्षात अतिधोकादायक यादीत नसलेल्या इमारती कोसळल्याच्या घटना अधिक आहेत. त्यानुसार आज कोसळलेल्या इमारतीचा समावेशही 2020 च्या अतिधोकादायक यादीत नव्हता. त्यामुळे म्हाडाच्या सर्व्हेक्षणावर प्रश्न उपस्थित होत आहे. या इमारतीच्या दुरुस्तीची जबाबदारी मालकाने घेतली होती. त्यानुसार त्याला दीड वर्षांपूर्वी दुरुस्तीसाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आले होते. त्यामुळे या इमारतीचे नाव अतिधोकादायक यादीत समाविष्ट करण्यात आले नसेल. पण या इमारतीची इतकी दुरवस्था असताना दुरुस्ती होते की नाही याकडे म्हाडाने लक्ष द्यायला हवे होते, अशी प्रतिक्रिया ट्रान्झिट कॅम्प असोसिएशनचे अध्यक्ष अभिजित पेठे यांनी दिली आहे. तर, म्हाडाच्या सर्वेक्षणावर नेहमीच प्रश्न उपस्थित केला जातो. अतिधोकादायक यादीत नसलेल्या इमारती मोठ्या संख्येने पडतात. त्यामुळे हे सर्वेक्षण तांत्रिक दृष्ट्या योग्य प्रकारे होणे गरजेचे आहे असे ही पेठे यांनी स्पष्ट केले आहे.
मालकविरोधात म्हाडा करावाई करणार का?
मालकाला दुरुस्तीसाठी ना हरकत प्रमाणपत्र देऊन ही मालकांने दुरुस्ती केली नाही. त्यामुळे त्याने म्हाडाकडे मुदतवाढ दिली. मात्र, त्यानंतरही दुरुस्ती काही झाली नाही आणि आज दोन जणांना जीव गमवावा लागला तर अनेकजण बेघर झाले. तेव्हा याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तर आता इतकी वर्ष दुरुस्ती रखडवणाऱ्या मालकावर कारवाई होणार का हाही प्रश्न आहे. याविषयी म्हाडाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया न देता चुप्पी साधली आहे. तर, म्हाडा उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर यांना विचारले असता आता लोकांना बाहेर काढत त्यांना सुरक्षित स्थळी हलवणे हा प्राधान्य क्रम असल्याचे म्हणत चौकशी वा कारवाईबद्दल बोलणे टाळले आहे.