मुंबई -मुंबई महानगरपालिकेचे नायर रुग्णालय कोरोनाबाधित गर्भवतींसाठी जसे आधार ठरले आहे, तसाच आधार डायलिसीसची गरज असणाऱ्या रुग्णांनाही येथे मिळत आहे. नायर रुग्णालयात डायलिसीसची गरज असणाऱ्या रुग्णांसाठी विशेष कक्ष सुरू करण्यात आला आहे. दोन महिन्यात 160 हून अधिक कोरोनाबाधित डायलिसीसची गरज असणाऱ्या रुग्णांना उपचार देण्यात आले आहेत. येथून कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या लक्षणीय आहे ही दिलासादायक बाब आहे.
कोरोनाच्या काळात खासगी रुग्णालये बंद असून जवळपास सर्वच पालिका आणि सरकारी रुग्णालये कोविड रुग्णालयात रूपांतरीत झाली आहेत. त्यामुळे नॉन कोविड रुग्णांचे मोठे हाल होत आहेत. त्यातही गर्भवती आणि डायलिसीसची गरज असणाऱ्या रुग्णांचा प्रश्न मोठा होता. ही बाब लक्षात घेत नायरमध्ये गर्भवती कोरोना रुग्ण आणि कोरोनाबाधित डायलिसीस रुग्णांसाठी विशेष कक्ष तयार करण्यात आला आहे.
डायलिसीस कक्ष 18 एप्रिलपासून कार्यान्वित झाला आहे. या कक्षात किडनी निकामी झाल्याने डायलिसीस करावे लागणारे कोरोनाबाधित रुग्ण आणि कोरोना झाल्यामुळे किडनीवर परिणाम होऊन डायलसीसची गरज पडणारे रुग्ण अशा दोन्ही प्रकारच्या रुग्णांवर उपचार केले जात असल्याची माहिती डॉ. कल्पना मेहता यांनी दिली आहे. 18 एप्रिलपासून आतापर्यंत 160 हून अधिक रुग्ण येथे दाखल झाले आहेत. यातील अनेक रूग्ण बरे होऊन जात आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर 80 टक्के असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
डायलिसीस रुग्णांना कोरोना झाल्यास त्यांच्यावर उपचार करणे सोपे जाते. पण, त्यात त्यांना मधुमेह वा इतर आजार असतील तर मात्र रुग्ण दगावण्याचा धोका वाढत आहे. त्यातही ज्यांना कोरोना झाला आणि ज्याची किडनी खराब झाली आहे, असे रूग्ण तात्काळ गंभीर होत आहेत.याच रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण कमी आहे, असेही डॉ. मेहता यांनी सांगितले आहे. पण, नायरच्या डॉक्टर-नर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची संपूर्ण टीम 100 टक्के प्रयत्न करत असल्याने रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे ही त्यांनी स्पष्ट केले आहे.