मुंबई - कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतून वगळण्यात आलेल्या आणि अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या त्या २७ गावांचे लवकरच नगर परिषदेत रुपांतर होणार आहे. यासंदर्भात विभागीय आयुक्तांकडे २ दिवस सुनावणी सुरू असून या सुनावणीचा अहवाल आल्यानंतर मुख्यमंत्री याबाबत निर्णय घेतील, अशी माहिती नगरविकास एकनाथ शिंदे यांनी आज(बुधवार) विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील २७ गावांची स्वतंत्र नगरपरिषद स्थापन करण्यासंदर्भात जगन्नाथ शिंदे, हेमंत टकले, किरण पावसकर यांनी याबाबतचा तारांकित प्रश्न विचारला होता. यावर नगरविकास मंत्र्यांनी सांगितले, या २७ गावांसंदर्भातील प्राप्त हरकती आणि सूचनाबाबत सुनावणी घेऊन अहवाल सादर करण्याचे आदेश कोकण विभागाच्या विभागीय आयुक्तांना देण्यात आले होते. यासंदर्भात आज व उद्या सुनावणी सुरू असून या सुनावणी संदर्भात विभागीय आयुक्तांचा अहवाल मिळाल्यानंतर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबाबत तातडीने निर्णय घेतील, असे त्यांनी स्पष्ट केले.