मुंबई- ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार, रंगकर्मी आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट दिग्दर्शक रत्नाकर मतकरी यांचे रविवारी (१७ मे) रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. गेले काही दिवस त्यांना थोडा थकवा जाणवत होता. चार दिवसांपूर्वी गोदरेज रुग्णालयात चेकअपसाठी अॅडमिट झाले असताना, त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली. यात ते पॉझिटिव्ह असल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांना उपचारांसाठी सेव्हन हिल्स रुग्णालयात हलवण्यात आले होते. तिथेच त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनावर कला क्षेत्रासह राजकीय क्षेत्रातील मंडळींनी शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली.
ज्येष्ठ साहित्यिक व रंगकर्मी रत्नाकर मतकरी यांचं निधन चटका लावून जाणारं आहे. नाटककार म्हणून, विशेषतः बाल रंगभूमीसाठी त्यांचे योगदान मोठे आहे. मराठी साहित्यातील कथा व ललित प्रांतातही त्यांनी अव्याहत दर्जेदार लेखन केले - शरद पवार (अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस)
शरद पवार यांनी केलेलं ट्विट...
ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार, रंगकर्मी आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट दिग्दर्शक रत्नाकर मतकरी यांचे आज दुःखद निधन झाले. मतकरींच्या जाण्याने साहित्य आणि रंगभूमी या क्षेत्रात कधीही भरुन न येणारी पोकळी निर्माण झाली आहे. भावपूर्ण श्रद्धांजली - जयंत पाटील ( जलसंपदामंत्री )
जयंत पाटील यांनी केलेलं ट्विट... महाराष्ट्राचं सांस्कृतिक विश्व समृद्ध करणारं महान व्यक्तिमत्व हरपलं असून साहित्यिक, रंगभूमी, सांस्कृतिक क्षेत्रातलं रत्नाकर मतकरी यांचं योगदान चिरंतन राहिल - अजित पवार (उपमुख्यमंत्री )रत्नाकर मतकरी यांच्या निधनाची बातमी धक्कादायक आहे. रत्नाकर मतकरी हे नाव महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेलं आहे. महाराष्ट्रातील आबालवृद्धांसाठी त्यांनी साहित्यनिर्मिती केली. कथा, गूढकथा, कादंबरी, एकांकिका, नाटकं अशा साहित्याच्या प्रत्येक क्षेत्रात त्यांनी मुशाफिरी केली. रंगभूमीवर यशस्वी नाटककार, दिग्दर्शक म्हणूनही त्यांनी लोकप्रियता मिळवली. साहित्य अकादमी, संगीत नाटक अकादमी पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले होते. चित्रपट दिग्दर्शनाचा राष्ट्रीय पुरस्कारही त्यांना मिळाला होता. अनेक मान, सन्मान, पुरस्कारांनी गौरविण्यात आलेल्या रत्नाकर मतकरी यांना मराठी साहित्य, कलारसिकांनीही नेहमीच भरभरून प्रेम, आदर, सन्मान दिला. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या साहित्य, कला विश्वाची मोठी हानी झाली आहे. अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शोकभावना व्यक्त केल्या आहेत.रत्नाकर मतकरींच्या निधनाने महाराष्ट्राने बहुआयामी ‘रत्न’ गमावले - बाळासाहेब थोरात ज्येष्ठ रंगकर्मी आणि साहित्यिक रत्नाकर मतकरी यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक बहुआयामी ‘रत्न’ गमावले आहे. त्यांच्या निधनाने साहित्य आणि रंगभूमी या क्षेत्रात न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे, अशा भावना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केल्या आहेत.
मतकरी हे साहित्यिक, रंगकर्मी, दिग्दर्शक, निर्माता आणि चित्रकारही होते. त्यांनी नाटक, एकांकिका, बालनाट्य, कथा, गूढकथा, कादंबरी, ललित लेख, अशा साहित्य प्रकारात दर्जेदार लेखन केले. ‘जावई माझा भला’, ‘चार दिवस प्रेमाचे’ अशा अनेक नाटकांमधून त्यांनी रसिकांच्या मनात घर केले. बालरंगभूमीची मुहूर्तमेढ रोवून अनेक बालनाट्यांची निर्मितीही केली. 'अलबत्या गलबत्या' आणि 'निम्मा, शिम्मा राक्षस' तसंच महाभारतातल्या अंतिम पर्वावर आधारित 'आरण्यक' ही नाटके रंगभूमीवर गाजली. वयाच्या सतराव्या वर्षी ‘वेडी माणसं’ या एकांकिकेपासून लेखनास सुरुवात केली ती शेवटपर्यंत अव्याहतपणे सुरूच होती, असे थोरात यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.