मुंबई - माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे महाराष्ट्राच्या बांधणीत खूप मोठे योगदान राहिले आहे. त्यांचे सर्वात मोठे योगदान हे जलसंपत्तीचे आहे. 14 हून अधिक मोठी धरणे बांधून त्यांनी अर्ध्या महाराष्ट्राची तहान भागवली. जायकवाडी, विष्णुपूरी आदी धरण त्यांच्याच कार्यकाळात उभी राहिली आणि या धरणांमुळे वाळवंट होण्यापासून मराठवाडा वाचले. म्हणूनच त्यांना महाराष्ट्राचे भगीरथ म्हटले जायचे, अशी माहिती ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.
माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा समारोप 14 जुलै रोजी होत असून त्या पार्श्वभूमीवर मधुकर भावे यांनी चव्हाण यांच्या कामकाजाची शैली तसेच त्यांच्या आठवणी जागवल्या. ते म्हणाले की, अर्ध्या महाराष्ट्राची तहान शंकरराव चव्हाणांनी भागवली होती. राज्यात जी 31 महाकाय धरणे आहेत, त्यापैकी उजनी, जायकवाडी आदी 14 धरणे ही त्यांच्या कार्यकाळात उभी राहिली. जायकवाडी येथे त्यांचे स्मारक आहे. हे धरण उभे राहात असताना लवादासमोर 22 आक्षेपांना शास्त्रीय पद्धतीन उत्तरे देण्यात आली होती, असेही मधुकर भावे म्हणाले.
शंकरराव चव्हाण हे 1975मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले होते, दहा वर्षे पाटबंधारे खात्यासह इतर अनेक मोठ्या खात्यांची जबाबदारी त्यांनी सांभाळली होती. शंकरराव चव्हाण यांच्या कामाची एक शैली होती. मोरारजी देसाईंनंतर बरोबर 10 वाजता मंत्रालयात येऊन काम सुरू करणारे ते दुसरे मुख्यमंत्री होते. प्रशासनाला शिस्त लावण्याचे काम त्यांनी केले. म्हणून लोकांनी त्यांना टिंगल म्हणून हेडमास्तर, मास्तरही म्हणायचे. एक सामाजिक बांधिलकी म्हणून पाहिले पाहिजे, त्यांनीच सचिवालयांचे 'मंत्रालय' करून घेण्याचा निर्णय घेतला हेाता. सचिव यांच्यापेक्षा मंत्र्याचे स्थान मोठे आहे, हे त्यांनी याद्वारे दाखवून दिले, अशी माहितीही भावे यांनी दिली.