मुंबई Rashmi Shukla New DGP :आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्राच्या नव्या पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. फोन टॅपिंग प्रकरणानंतर रश्मी शुक्ला यांचं नाव चर्चेत आलं होतं. राज्यातील सर्वात वरिष्ठ आयपीएस अधिकारी असल्याने त्यांच्या खांद्यावर राज्याच्या सुरक्षेची जबाबदारी देण्यात आली आहे. राज्याच्या गृह विभागाने याबाबत आदेश जारी केला आहे. तत्कालीन पोलीस महासंचालक रजनीश सेठ हे ३१ डिसेंबरला पोलीस महासंचालक पदावरून निवृत्त झाले आहेत. रश्मी शुक्ला या १९८८ च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत.
फोन टॅपिंग प्रकरणी शुक्ला होत्या चर्चेत : पोलीस महासंचालक पदासाठीच्या ज्येष्ठता यादीत रश्मी शुक्ला यांचे नाव आघाडीवर होते. त्या गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतल्या अधिकारी आहेत असं बोललं जातं. रश्मी शुक्ला यांना मुंबईचे पोलिस आयुक्त करण्यात येणार असल्याची चर्चा होती. शेवटी त्यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झाली. रश्मी शुक्ला या राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक असतील. राजकीय नेत्यांच्या फोन टॅपिंग प्रकरणात त्यांच्यावर आरोप होते. रश्मी शुक्ला या उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळच्या मानल्या जातात. सशस्त्र सीमा बल विभागाच्या पोलीस महानिदेशक पदी रश्मी शुक्ला यांची गेल्यावर्षी मार्चमध्ये नियुक्ती करण्यात आली होती.
रश्मी शुक्ला पहिल्या महिला DGP : केंद्रीय लोकसेवा आयोगाची बैठक शुक्रवार 29 डिसेंबरला पार पडली. यावेळी त्यांनी महासंचालकपदासाठी तीन अधिकाऱ्यांच्या नावांची यादी पाठवली होती. यामध्ये पहिले नाव रश्मी शुक्ला यांचे होते. यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना निर्णय घ्यावा लागला. अखेर गुरुवारी सरकारने शुक्ला यांच्या नियुक्तीचे आदेश जारी केले. रश्मी शुक्ला यांना ६ महिन्यांचा कार्यकाळ मिळणार आहे. मात्र, त्यानंतर राज्य सरकार त्यांना वाढवू शकते. रश्मी शुक्ला या १९८८ च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत. महाराष्ट्र पोलिसांच्या सर्वात वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांपैकी एक असून शुक्ला यांनी पुण्याचे पोलीस आयुक्त म्हणूनही कामकाज पाहिले आहे. दरम्यान, रश्मी शुक्ला यांच्या नावावर मोहर लागेपर्यंत राज्याच्या पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्या खांद्यावर देण्यात आला होता.
रश्मी शुक्लांवर होते आरोप : 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात रश्मी शुक्ला राज्य गुप्तचर विभागाच्या प्रमुख होत्या. या पदाचा गैरवापर करून तत्कालीन विरोधी पक्षाच्या नेत्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. याप्रकरणी त्यांच्यावर मुंबई, कुलाबा, पुणे येथे दोन गुन्हे दाखल होते. महाविकास आघाडी सरकारच्या काळात ही कारवाई करण्यात आली होती. राज्यात सरकार बदलताच पोलिसांनी पुण्यातील गुन्ह्याप्रकरणी सी समरी रिपोर्ट कोर्टात सादर केला. त्यामुळं मुंबईच्या प्रकरणात त्यांच्यावर खटला चालवण्यास सरकारनं नकार दिला. त्यामुळं मुंबई उच्च न्यायालयानं त्यांच्याविरुद्धचे दोन्ही एफआयआर रद्द केले आहेत.
हेही वाचा -Nana Patole on Phone Tapping : रश्मी शुक्लांविरोधात 500 कोटींचा मानहाणीचा दावा दाखल करणार - नाना पटोले