मुंबई -देशात हिंदू-मुस्लिम ऐक्याबद्दल आज न बोललेलेच बरे आहे. कारण गांधींच्या हत्येला जी विचारसरणी जबाबदार आहे, त्याच विचारसरणीचे लोक आज सत्तेत आहेत, असे मत ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत डॉ. विवेक कोरडे यांनी व्यक्त केले. आज (शुक्रवारी) महात्मा गांधींची 151वी जयंती आहे. यानिमित्ताने डॉ. कोरडे यांच्याशी 'ईटीव्ही भारत'ने संवाद साधला.
गांधी जयंतीनिमित्त डॉ. विवेक कोरडे यांच्याशी बातचीत महात्मा गांधी यांनी मूठभर मीठ उचलले आणि देशातील बलाढ्य असलेल्या सत्तेचा पाया खचून गेला. साऱ्या भारतीयांची तन-मन-धन याची प्रेरणा गांधीच्या या दुबळ्या हातामध्ये एकवटली होती. त्यातून हा देश एक करण्याचे, नवराष्ट्र आणि नवा राष्ट्रवाद निर्माण करण्याचे गांधींचे योगदान मोठे होते, असे मतही त्यांनी मांडले.
महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त डॉ. कोरडे यांनी गांधी यांच्या योगदानाची माहिती देताना सांगितले की, महात्मा गांधी यांनी भारतीय स्वातंत्र्यानंतर या देशामध्ये अधिक चांगल्या सामाजिक आणि आर्थिकस्तराचे जीवन मिळेल याची हमी दिली. गांधींनी सारा भारत जोडला, ही गांधींची सर्वसमावेशकता होती. आपला राज्यकर्ता कोण आहे? याच्याशी फारसे देणेघेणे नसलेल्या सर्वसामान्यांच्या मनामध्ये देखील त्यांनी एक राष्ट्रीयत्वाची भावना जागवली. तिला आपण आज 'आयडिया ऑफ इंडिया' असे म्हणतो, असे त्यांनी नमूद केले.
गांधींनी या देशाच्या स्वातंत्र्य आंदोलनाचे नेतृत्व केले, ही गोष्ट खरी आहे. मात्र, ती पूर्णपणे खरे नाही. वास्तविक, गांधीजींनी आपल्या नेतृत्त्वाखाली स्वातंत्र्यलढा उभारला. महात्मा गांधींनी या देशात 1917पासून ते 1942पर्यंत एकूण चार मोठी आंदोलने केली. सुरुवातीच्या असहकाराच्या आंदोलनामध्ये जेव्हा चौरीचौराच्या काही हिंसक घटना समोर आल्या, त्यामुळे गांधीनी हे आंदोलन ताबडतोब मागे घेतले. त्यानंतर 1932-30च्या मिठाच्या सत्याग्रहात महात्मा गांधी आणि मोजून 78सत्याग्रही निवडले होते. त्यापुढे 1940मध्ये गांधीजींनी वैयक्तिक सत्याग्रहाला सुरुवात केली होती, अशी माहितीही डॉ. कोरडे यांनी यावेळी दिली. महात्मा गांधी यांच्या स्वराज्याच्या आंदोलनाची त्रिसूत्री ही एक तर स्वदेशी, हिंदू - मुस्लिम ऐक्य आणि अस्पृश्यता निवारण ही होती. आजच्या घडीला स्वदेशीचे महत्त्व या देशात राहिले आहे, असे दिसत नाही. गांधींजींच्या हत्येला जी विचारसरणी जबाबदार होती, तीच विचारसरणी आज सत्तेवर आलेली आहे. अस्पृश्यता निवारण यामध्ये केवळ अस्पृश्यता घालवणे, हा एवढाच गांधीजींचा विचार नव्हता. या देशांमध्ये असलेल्या कष्टकरी, समाजाला किमान सामाजिक प्रतिष्ठेचे जीवन जगता यावे, हे गांधीजी यांच्या अस्पृश्यता निवारणामागची मूळ कल्पना होती आणि यातच जातीव्यवस्थेचे निर्मूलन ही गोष्टसुद्धा अंतर्भूत होती.
तसेच महात्मा गांधींनी देशातील लोकांना स्वातंत्र्याकांक्षी बनवण्याचे काम केले. या देशातील दलित, मजूर, शेतकरी, महिला आदींच्या उत्थानाचा हा कार्यक्रम होता. हे सर्व लोक आर्थिकदृष्ट्या एका निम्नस्तरावर त्यावेळी होते. त्या लोकांचे उत्थान भारतीय स्वातंत्र्यलढ्याशी जोडलेले होते, अशी माहितीही डॉ. कोरडे यांनी दिली.