मुंबई- पोलीस आयुक्त संजय बर्वे यांना महाविकास आघाडीने पुन्हा मुदतवाढ देण्याचे टाळल्यानंतर संजय बर्वे हे शुक्रवारी (दि. 28 फेब्रुवारी) सेवानिवृत्त झाले आहेत. मुंबईतील नायगाव पोलीस परेड मैदानावर मुंबई पोलीस विभागाकडून परेडच्या माध्यमातून सलामी देऊन मावळत्या पोलीस आयुक्तांना निरोप देण्यात आला.
मावळते पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी मुंबई पोलिसांना उद्देशून केलेल्या भाषणात त्यांच्या कार्यकाळातील बऱ्याच गोष्टींना उजाळा दिला. संजय बर्वे म्हणाले, मुंबई पोलीस आयुक्त म्हणून मी वर्षभर धुरा सांभाळली. या वर्षभरात मुंबई पोलिसांनी उत्तम काम केले. निवडणुकीनंतरचा शपथविधी असो, निवडणुका असो, विविध आंदोलन असो, प्रत्येक ठिकाणी मुंबई पोलिसांनी उत्तमरित्या त्यांची जबाबदारी पार पाडली. पोलीस काम करताना वेळ आणि सुट्टी बघत नाहीत. खाकी वर्दी घातल्यावर बाकी सर्व विचार दुय्यम असतात.