मुंबई - वाढते कोरोना संक्रमण लक्षात घेता गेल्या काही दिवसात राज्य सरकारच्या विविध खात्यांनी जप्त केलेली पीपीई कीट्स वापरात आणण्यासाठी खुली करावीत, यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस आणि माजी आमदार मोहन जोशी यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून त्यावर राज्य सरकारने याबाबत माहिती द्यावी, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.
जप्त केलेले मास्क, सॅनिटायझर, पीपीई कीट्स वैद्यकीय सेवेत तातडीने उपलब्ध करुन द्यावेत, उच्च न्यायालयात याचिका - कोरोना मुंबई
राज्य सरकारच्या विविध खात्यांनी जप्त केलेली पीपीई कीट्स वापरात आणण्यासाठी खुली करावीत, यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस आणि माजी आमदार मोहन जोशी यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश बी. पी. कोलाबावाला यांच्या खंडपीठासमोर सोमवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी घेण्यात आली होती. या दाखल याचिकेद्वारे सांगण्यात आले होते की, सध्या राज्यात कोरोना संक्रमण वाढत असून याचा सामना करण्यासाठी डॉक्टर, परिचारिका व इतर वैद्यकीय पथकाला हँड सॅनिटायझर, मास्कसारख्या वैद्यकीय साहित्याचा तुटवडा भासत आहे. मात्र, गेल्या दीड महिन्यात आरोग्य खाते, पोलीस व इतर विभागाकडून करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान मुंबई, ठाणे व पुणे यासारख्या परिसरात मोठ्या प्रमाणावर हॅन्ड सॅनिटायजर, मास्क व पीपीई किट जप्त करण्यात आले आहेत. मात्र, हा जप्त मुद्देमाल या संकट काळात वैद्यकीय उपचार करणाऱ्या डॉक्टर, नर्स व इतर वैद्यकीय पथकाला देण्याच्या मार्गदर्शक सूचना सध्या देण्यात आलेल्या नाहीत. तरी या संदर्भांत जनहित लक्षात घेऊन स्वतः उच्च न्यायालयानेच याबाबत निर्देश द्यावेत अशी मागणी करण्यात आली आहे.