मुंबई- परीक्षकांना शाळेत पेपर तपासणीच्या दरम्यान शाळेत इतर कामे देण्यात येऊ नये, अनुदानित प्रमाणेच विना अनुदानित व सेल्फ फायनान्स शाळा व ज्युनिअर कॉलेजला परीक्षा केंद्र द्यावे, यासह विविध मागण्या आज (बुधवार) भाजपच्या शिक्षक आघाडीने राज्य शिक्षण मंडळाच्या मुंबई विभागाकडे केल्या आहेत. परीक्षकांना शाळेत पेपर तपासणी दरम्यान, वेगवेगळी कामे दिली जातात. यामुळे शिक्षक आघाडीच्या प्रमुखांनी आज मुंबई विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली.
अनुदानित शाळा व कॉलेजप्रमाणेच विना अनुदानित व सेल्फ फायनांसमधील शाळा कॉलेज मधील मान्यताप्राप्त शिक्षकांना पेपर तपासणीचे काम देण्यात यावे अशी मागणीही भाजपच्या शिक्षक आघाडीने केली आहे. यासाठी आज महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ मुंबई विभागाचे अध्यक्ष कृष्णकुमार पाटील, सचिव शरद खंडागळे यांची आघाडीचे मुंबई-कोकण विभाग संयोजक अनिल बोरनारे, सहसंयोजक बयाजी घेरडे, सुभाष अंभोरे, सचिन पांडे आदींनी भेट घेतली.