मुंबई :२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला विदर्भात अपेक्षित जागा मिळवता आल्या नाहीत. याउलट २०१४ साली मिळालेल्या जागेमध्ये सुद्धा घट झाली. २०१९ साली शिवसेना-भाजप युतीने एकत्रितपणे निवडणुका लढून सुद्धा काँग्रेसने विदर्भात सेना-भाजप युतीला जोरदार टक्कर दिली. विदर्भ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जात असला तरी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला हवे तसे यश संपादन करता आले नाही. उलट अर्थी २०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत विदर्भात भाजपने एकूण ४३ जागा मिळाल्या होत्या. त्या तुलनेत इतर पक्षांना हवे तसे यश मिळवता आले नाही.
वेगळ्या विदर्भाचे आश्वासन : येथे काँग्रेसला १०, राष्ट्रवादी काँग्रेसला १, शिवसेनेला ४ आणि इतर पक्षांना ४ जागा मिळाल्या होत्या. याच भरघोस यशाच्या जोरावर भाजपने तेव्हा १२२ जागांपर्यंत मजल मारली होती. परंतु २०१९ साली भाजपला विदर्भात मोठा फटाका सहन करावा लागला. भाजपने २०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये विदर्भातील जनतेला वेगळ्या विदर्भाचे आश्वासन दिले होते. ते आश्वासन भाजपने पूर्ण केले नाही. त्याचबरोबर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भात महत्त्वाच्या नेत्यांचे पत्ते कापल्याने व स्वत:च्या मर्जीतले उमेदवार दिल्याने भाजपचा कार्यकर्तेही नाराज झाले होते. त्याचा मोठा फटका भाजपला बसला.
काँग्रेसच्या आमदारांच्या संख्येत वाढ :२०१४ च्या निवडणुकीत विदर्भातून काँग्रेसचे १० आमदार निवडून आले होते. तर २०१९ साली ही संख्या १७ वर गेली. तर २०१४ च्या निवडणुकीत भाजपचे ४३ आमदार निवडून आले होते. २०१९ च्या निवडणुकीत त्यात घट होऊन त्यांचे २९ आमदार निवडून आले. २०१९ साली राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या संख्येत वाढ झाली. २०१४ साली राष्ट्रवादी काँग्रेसचा १ आमदार निवडून आला असताना २०१९ साली ही संख्या ५ वर गेली.
विदर्भातील १० लोकसभा मतदारसंघ : विदर्भातील १० लोकसभा मतदारसंघापैकी भाजपकडे नागपूर - नितीन गडकरी, अकोला - संजय धोत्रे, वर्धा- रामदास तडस, गडचिरोली- अशोक नेते, भंडारा-गोंदिया - सुनील मेंढे हे पाच खासदार आहेत. तर अगोदर उद्धव ठाकरे यांच्याकडे असलेले ३ खासदार यवतमाळ - भावना गवळी, बुलडाणा-प्रतापराव जाधव, रामटेक- कृपाल तुमाणे यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केल्याने ते आता भाजप शिवसेना (बाळासाहेबांची) यांच्यासोबत आहेत. तर काँग्रेसकडे चंद्रपूर - सुरेश धानोरकर हे एकमेव खासदार आहे. अमरावतीमत नवनीत राणा या शिंदे - फडणवीस सरकारसोबत आहेत.
भाजपला काट्याची टक्कर :राज्यात नाट्यमय सत्तांतर झाल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे बुलढाणा- प्रतापराव जाधव, रामटेक - कृपाल तुमाणे, यवतमाळ - भावना गवळी हे तीनही खासदार यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याकडे आता विदर्भात एकही खासदार शिल्लक नाही आहे. त्यातच आमदार संजय राठोड, आमदार डॉक्टर संजय रायमुलकर, आमदार संजय गायकवाड या विदर्भातील आमदारांनी सुद्धा शिंदे गटात प्रवेश केल्याने शिवसेनेचे विदर्भातील वर्चस्व संपुष्टात आल्यासारखे आहे. तरीसुद्धा महाविकास आघाडीत असल्याकारणाने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या जोरावर शिवसेना पुन्हा ताकतीने विदर्भात उभी राहण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वर्तवली जात आहे. म्हणूनच महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा मोठ्या प्रमाणात यशस्वी करण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने ही पूर्ण ताकद विदर्भात पणाला लावली आहे. या विदर्भात भाजपला कडी टक्कर देण्यासाठी व देवेंद्र फडणवीस यांचे वर्चस्व कमी करण्यासाठी महाविकास आघाडी जोरकस प्रयत्न करताना दिसत आहे.
सभेतील भाषणांकडे सर्वांचे लक्ष :विदर्भातील नागपूर येथील सभेची जोरदार तयारी महाविकास आघाडीकडून करण्यात आलेली आहे. संभाजीनगर येथील वज्रमुठ ही पहिली सभा यशस्वीपणे पार पडल्यानंतर नागपुरातील या सभेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. उद्धव ठाकरे, अजित पवार यांच्यासह या सभेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे सुद्धा असणार आहेत. संभाजीनगर येथील वज्रमूठ पहिल्या सभेत नाना पटोले यांच्या अनुपस्थितीवरून अनेक राजकीय चर्चा रंगल्या होत्या, अशा परिस्थितीत नाना पटोले हे शिंदे - फडणवीस सरकारचा समाचार कशा पद्धतीने घेतात हे सुद्धा बघणे महत्त्वाचे असणार आहे. त्याचबरोबर विदर्भातील आपले खासदार व आमदार गमावलेले उद्धव ठाकरे त्यांचा समाचार कशा पद्धतीने घेतात, याकडेही सर्वांचे लक्ष लागलेले आहे. तर दुसरीकडे भाजपच्या जास्त जवळीक जाण्याच्या प्रयत्नात असलेले विरोधी पक्ष नेते, राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते अजित पवार सध्याच्या परिस्थितीवर काय भाष्य करतात हेसुद्धा बघणे महत्त्वाचे असणार आहे.
महाविकास आघाडीचा भाजपला धसका :या सभेविषयी बोलताना काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले की, महाविकास आघाडीचा मोठा धसका हा भाजपने घेतला आहे. विदर्भामध्ये ज्या पद्धतीने काँग्रेस कमबॅक करत आहे, त्याचा मोठा पोटशूळ भाजप नेत्यांना आता झाला आहे. मागे भाजपने स्वतंत्र विदर्भाची घोषणा केली होती, परंतु त्याच अजून काही झालेले नाही. टाटा एअरबसचा प्रोजेक्ट येथून गेला आहे. रामदेव बाबांना स्वस्तात जमीन देऊन सुद्धा त्यांच्या उद्योगाने अजून टेकऑफ घेतलेला नाही आहे. परंतु संविधान, लोकतंत्र व लोकशाही वाचवण्यासाठी आता महाविकास आघाडी एकत्र आली आहे. काही ठराविक मित्रांच्या हातात पैसे देण्याच्या नादात भाजपने जनतेला उपाशी ठेवले आहे. परंतु येणाऱ्या दिवसात हे सर्व दूर होऊन महाविकास आघाडीचे सरकार पुन्हा एकदा राज्यात आल्याशिवाय राहणार नाही, असेही अतुल लोंढे म्हणाले आहेत. विदर्भात २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने २९ जागा जिंकल्या होत्या. शिवसेनेने ३ जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसने १७ जागा जिंकल्या होत्या. राष्ट्रवादीने ५ जागा जिंकल्या होत्या. इतरमधून ७ जागा जिंकल्या होत्या. एकूण ६२ जागा जिंकल्या होत्या.
हेही वाचा : Atul Londhe : पुण्यात भाजपची टोळधाड आली; काँग्रेसचे अतुल लोंढेंचा घणाघात