मुंबई : आयएल अँड एफएस प्रकरणी जयंत पाटील यांची चौकशी होणार आहे. आयएल अँड एफएस प्रकरणी ईडीने राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना मागील गुरुवारी नोटीस पाठवली होती. 15 मेला ईडीने चौकशीसाठी हजर राहण्याच्या आदेश दिले होते. त्यानंतर जयंत पाटील यांनी ईडीकडे कालावधी वाढवून मागितला होता. त्यामुळे ईडीने पुन्हा दुसरे समन्स बजावून जयंत पाटील यांना पुढच्या सोमवारी म्हणजेच 29 मे ला चौकशीसाठी बोलावले आहेत. यापूर्वी, आयएल अँड एफएसशी संबंधित मनी लाँड्रिंग चौकशीत, कोहिनूर कन्स्ट्रक्शनला दिलेल्या कर्जासंदर्भात ईडीने राज ठाकरे यांचीही चौकशी केली होती.
कमिशन दिल्याचा ईडीला संशय :या प्रकरणात एका व्यक्तीला अनेक कंत्राट मिळाली होती, त्या व्यक्तीने अनेकांना कमिशन दिल्याचा ईडीला संशय आहे. त्याची पडताळणी करण्यासाठी जयंत पाटलांना ईडीने चौकशीसाठी बोलावले आहे. आजपर्यंत समस्या मार्गाने जगलो. त्यामुळे सचोटीने काम केले. कोणताही गैर कारभार केला नाही, त्यामुळे ईडीच्या आलेल्या नोटीसीला घाबरण्याचे काहीच कारण नाही. महाविकास आघाडी मोडायचे प्रयत्न सत्याधाऱ्यांकडून चालू आहे. राज्यात पुन्हा महाविकास आघाडीचे शासन येईल, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केले होते.
सोमवारी ई़डीकडून चौकशी होणार : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीची नोटीस पाठविण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील हे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या जवळचे आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीला शह देण्यासाठी ही नोटीस बजावण्यात आल्याची चर्चा आहे. जयंत पाटील यांना आयएल अँड एफएस प्रकरणात ही ईडीचे समन्स पुन्हा पाठविण्यात आले आहे. त्यांना सोमवारी ईडी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. येत्या सोमवारी जयंत पाटील यांची ई़डीकडून चौकशी होणार आहे.