मुंबई -महापालिकेच्या भंगार विक्रीत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजपचे नगरसेवक व पक्षनेते विनोद मिश्रा यांनी केला आहे. या प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाईची मागणीही मिश्रा यांनी केली. कोरोना विषाणूचा प्रसार सुरू झाल्यापासून भाजपाकडून भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला जात आहे. या आरोपात आता आणखी एका नवीन आरोपात भर पडली आहे.
भंगार विक्रीत घोटाळा -
मुंबई महापालिकेकडून नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो. यासाठी वापरण्यात येणारे जुने पाईप भंगारात विकले जातात. सध्या १ लाख १८ हजार किलो वजनाच्या या लोखंडी तुकड्यांची भंगारात विक्री करण्यासाठी पालिकेने कंत्राटदार नेमला आहे. या विक्रीतून पालिकेला ३२ कोटी २६ लाख ७९ हजार रुपये मिळणार आहेत. या भंगार विक्रीत घोटाळा झाल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात आला आहे. कोणितीही निविदा प्रक्रिया न राबवता जुन्याच कंत्राटदाराला भंगार विक्रीचं कंत्राट दिल्यामुळे यात कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप भाजपने केला. याप्रकरणी दोषी अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी विनोद मिश्रा यांनी केली आहे.