मुंबई -कोरोनामुक्त ग्रामीण भागातील आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यात आल्या. त्यानंतर आता शहरी भागातीलही आठवी ते बारावी आणि ग्रामीण भागातील पाचवी ते सातवीच्या शाळा 17 ऑगस्टपासून सुरू करण्यात येणार असल्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासंबंधित आज शासनाने आदेश जारी केला आहे. त्यामुळे आता राज्यातील शाळांची घंटा वाजणार आहे.
आज काढला शासन आदेश -
मागील वर्षी शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झालेले आहे. यंदा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने विदर्भ वगळता राज्यातील इतर भागात १५ जून २०२१ आणि विदर्भात २८ जून २०२१ पासून शैक्षणिक वर्ष सुरु केले आहे. सध्या राज्यात कोरोना रुग्णसंख्येत घट झाली आहे. त्यामुळे कोविड मुक्त काही जिल्ह्यांमध्ये मध्यंतरी शाळा सुरू झाल्या होत्या. तर काही जिल्ह्यांमध्ये दीड वर्षांपासून विद्यार्थी घरी आहेत. त्यामुळे ते वर्गातील वातावरण विसरले आहेत. त्यांना पुन्हा त्या वातावरणात आणणे आवश्यक आहे.
त्यासाठी राज्यातील कोरोनामुक्त ग्रामीण भागामध्ये 15 जुलैपासून आठवी ते बारावीच्या शाळा सुरू करण्यात आल्या. त्यानंतर आता शहरी भागातील आठवी ते बारावीच्या शाळा आणि ग्रामीण भागातील पाचवी ते सातवीपर्यंतच्या शाळा 17 ऑगस्टपासून सुरू करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला होता. तसेच शाळा सुरू करण्यासंदर्भात शालेय शिक्षण विभागाने विशेष समिती स्थापन केली आहे. या समितीकडून मिळणार्या सूचनांनुसार शाळा सुरू करण्याबाबत विचार करण्यात आलेला होता. तसा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठविण्यात आलेला होता. या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे. यासंबंधित आज शासनाने आदेश जारी केला आहे.