मुंबई- राज्यातील शाळा कधी सुरू करायच्या यासंदर्भात सोमवारी शालेय शिक्षण विभागाने जीआर काढून त्यासाठीच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार प्रत्येक वर्गातील एका बेंचवर एकच विद्यार्थी बसेल आणि एका वर्गात २० ते ३० पेक्षा अधिक विद्यार्थी संख्या नसेल अशी व्यवस्था शाळांमध्ये आणली जाणार आहे. त्यामुळे आत्तापर्यंत शुल्क आणि डोनेशनच्या नादात विद्यार्थ्यांना शाळांमध्ये कोंबून बसवणाऱ्या शेकडो शाळांची अडचण होणार आहे. अनेकांना विद्यार्थी कसे बसवायचे याचे नियोजन करताना, आपल्या शाळांची संपूर्ण रचनाच बदलावी लागणार आहे.
एका बेंचवर एकच विद्यार्थी... शेकडो शाळांची होणार अडचण - शाळा सुरू होणार बातमी
राज्यातील खासगी आणि स्वयंअर्थसहायित शाळांमध्ये पूर्व प्राथमिकपासून ते दहावीपर्यंच्या चार ते सहा विद्यार्थ्यांना एकाच बेंचवर बसवले जाते. एका वर्गात ३० ते ५० हून अधिक विद्यार्थी दाटीवाटीने बसवले जातात. एका बेंचवर किमान दोन ते तीन विद्यार्थी बसविण्यासाठी असलेले नियम आतापर्यंत शाळांकडून पायदळी तुडवले जात होते.
शालेय शिक्षण विभागाने सोमवारी काढलेल्या जीआरमध्ये विद्यार्थ्यांच्या वर्गात बसण्याची व्यवस्था कशा प्रकारे असेल याचे नियोजन करण्याची जबाबदारी ही संबंधित शाळा व्यवस्थापन समितीवर सोपवली आहे. एका वर्गात एक बेंचवर एक विद्यार्थी किंवा एका वर्गात 20 ते 30 विद्यार्थी बसण्याची व्यवस्था करावी. तसेच विद्यार्थांच्या बैठक व्यवस्थेमध्ये किमान एक मिटर अंतर ठेवावे, असे निर्देश समितीला दिले आहेत. शाळा सुरू करताना, विद्यार्थांमध्ये सुरक्षित शारीरिक अंतर राखणे शक्य व्हावे, याकरिता शाळा दोन सत्रांमध्ये सुरू करणे, एक सत्र जास्तीत जास्त तीन तासांचे किंवा वेगवेगळ्या वर्गाच्या विद्यार्थांनी एक दिवस सोडून अदलाबदलीने शाळेत यावे, याबाबत शाळा व्यवस्थापन समिती विचार करेल, असे या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.
आतापर्यंत नियम पायदळी...
राज्यातील खासगी आणि स्वयंअर्थसहायित शाळांमध्ये पूर्व प्राथमिकपासून ते दहावीपर्यंच्या चार ते सहा विद्यार्थ्यांना एकाच बेंचवर बसवले जाते. एका वर्गात ३० ते ५० हून अधिक विद्यार्थी दाटीवाटीने बसवले जातात. एका बेंचवर किमान दोन ते तीन विद्यार्थी बसविण्यासाठी असलेले नियम आतापर्यंत शाळांकडून पायदळी तुडवले जात होते. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी जारी करण्यात आलेल्या नवीन मार्गदर्शक सूचनांमुळे अनेक शाळांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागणार आहे.
अशा आहेत राज्यात शाळा..
राज्यात शालेय शिक्षण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या प्राथमिकच्या पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा या १ लाख ६ हजार २३७ इतक्या असून यात दोन कोटींच्या दरम्यान विद्यार्थी शिक्षण घेतात. तर माध्यमिक आणि उच्च माध्यमिकच्या २७ हजार ४४६ शाळा असून यात ६६ लाख विद्यार्थी शिक्षण घेतात. तर सीबीएसई, आयसीएसई, आदी मंडळाच्या १ हजार २७७ शाळा आणि मागील वर्षी ज्यांची नोंद झाली नाही अशा स्वयंअर्थसहायितच्या ७ हजारांहून अधिक शाळा राज्यात आहेत. या शाळांमध्ये सुमारे ६० लाखांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेताहेत. तर मुंबईत महापालिका शिक्षण विभागाच्या प्राथमिकच्या ९६६ माध्यमिकच्या २२३ शाळा असून यात ५ लाख ४१ हजार ८८० विद्यार्थ्यांची क्षमता आहे.