मुंबई - राज्यात 15 जूनपासून शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली आहे. कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे शाळा मात्र प्रत्यक्षात भरू शकलेल्या नाहीत. शालेय शिक्षण विभागाने ऑनलाइन शाळा सुरू करण्याचा खटाटोप केला, त्यानंतरही ग्रामीण भागातील विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणापासून कोसो दूर राहिला आहे. परिणामी शिक्षण विभागाने यंदा वेळेत पाठ्यपुस्तके उपलब्ध केली असली तरी शाळाच सुरू नसल्याने या पुस्तकातून आमच्या पोरांनी शिकायचे कसे, असा प्रश्न ग्रामीण भागातील पालकांपुढे पडला आहे.
मुंबई, पुणे आदी महानगरपालिकांचा अपवाद वगळता शालेय शिक्षण विभागाने शैक्षणिक वर्षांच्या सुरूवातीलाच पहिली ते आठवीपर्यंतच्या तब्बल 1 कोटी 10 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके उपलब्ध करून दिली आहेत. मात्र, या पुस्तकांमधून काय शिकायचे असा प्रश्न ग्रामीण, दुर्गम आणि आदिवासी भागातील विद्यार्थी व पालकांपुढे पडला आहे. कोरोनामुळे शाळा बंद आहेत तर ग्रामीण भागात ऑनलाइन शिक्षण पोहचलेले नाही, यामुळे आमच्या पाल्यांचे भवितव्यच अंधारात सापडले असल्याच्या प्रतिक्रिया पालकांकडून येत आहेत.
विदर्भातील गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आदी जिल्ह्यामध्ये फिरत असतो. या भागातील भटक्या-विमुक्त, आदिवासी, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सरकार ऑनलाइन शिक्षण कसे देणार आहे, हे अजूनही उमगलेले नाही. यंदा पहिल्यांदाच दिवाळीच्या पूर्वी पुस्तके मिळाली आहेत. मात्र, आता शाळा सुरू नाहीत, शाळांमध्ये विद्यार्थी नाहीत, त्यामुळे शिक्षणही नाही. त्यामुळे मिळालेल्या पुस्तकांचा उपयोग काय, असे संघर्ष वाहिनीचे संघटक मुकूंद आडेवार यांनी सांगितले.
मेळघाटात एकदा शिक्षक आले व पुस्तकांचे वाटप करुन गेले. त्यानंतर पुन्हा ते शाळेत आले नाहीत त्यामुळे मुलांचा अभ्यासही नाही. मुलांना पुस्तके मिळाली परंतु शिक्षण सुरू नसल्याने कुणी जनावरे चारत फिरतेय तर कोणी असेच गावात फिरत आहेत. मुलांना ऑनलाइन शिक्षण मिळेल असे सांगितले, अद्याप त्याबाबत काहीही कार्यवाही झालेली दिसत नाही. त्यामुळे आमच्या विद्यार्थ्यांना कसे शिक्षण मिळणार, असा प्रश्न पडल्याचे चिखलदऱयाच्या राहू गावातील शामराव कासदेकर म्हणाले.
गावात काही विद्यार्थ्यांना पुस्तके मिळाली आहेत. पण शिक्षण सुरू झालेले नाही. परिसरातील बोरगा, मदनापूर गावातही अशीच परिस्थिती आहे. शाळा व्यवस्थापन समित्या नावापुरत्याच असल्याने गोरगरीब विद्यार्थ्यांकडे कोणी लक्ष देत नसल्याचे कालपाणी गावातील उषाताई बेलसरे यांनी सांगितले.
ठाणे, पालघर जिल्ह्यातील दुर्गम आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांनाही काय आणि कसे शिकायचे असा प्रश्न पडला आहे. ऑनलाइन शिक्षणाचा मोठा बाऊ केला जात असून तळापर्यंतचे वास्तव वेगळे असल्याचे समर्थन संस्थेचे रूपेश कीर यांनी सांगितले.