मुंबई : तुम्हाला जर ऑनलाईन पार्ट टाईम जॉबची ऑफर आली असेल तर ती स्वीकारू नका. वेळीच सावध व्हा. नाहीतर तुम्ही तुमचे कष्टाने कमावलेले पैसे गमवून बसाल. सायबर क्राइमचा असाच काहीसा प्रकार चुनाभट्टी परिसरात घडला आहे. चुनाभट्टी पोलिसांनी या सायबर चोरट्यांच्या मुसक्या राजस्थानातून आवळल्या आहेत. सायबर चोरट्यांनी सध्या आपला मोर्चा टेलिग्राम या सोशल मीडिया ॲप कडे वळवला आहे. ते टेलिग्राम ॲपद्वारे लिंक पाठवून नागरिकांना आपल्या जाळ्यात ओढत असल्याचे दिसून येत आहे.
अशाप्रकारे फसविले जाते : कोरोना नंतर पार्ट टाइम वर्क फ्रॉम होम काम देण्याच्या बहाण्याने सायबर भुरट्यांनी अनेकांना गंडा घातला आहे. नुकतेच चुनाभट्टी पोलिसांच्या कारवाईत सायबर भामट्यांचे राजस्थान कनेक्शन उघड झाले आहे. तक्रारदारांना व्हॉट्स ॲपवर 'ग्लोबल अडवर्ट ऑफिशियल' या कंपनीच्या नावे पार्ट टाईम जॉबसाठी मेसेज पाठवून त्यांना कंपनीच्या टेलिग्राम ग्रुपशी जॉइन होण्यास सांगितले जाते. या ग्रुपवर त्यांना यू ट्यूब लिंक ओपन करून व्हिडीओ लाईक करण्याचा जॉब टास्क देण्यात येतो. जॉब टास्क केल्यानंतर त्यांच्या बँक खात्यात सुरुवातीला 150 रुपये जमा होतात. नंतर 1 हजार 300 रुपये जमा होतात. अशाप्रकारे टास्क पूर्ण केल्यावर बँक खात्यात पैसे जमा करून हे भूरटे लोकांचा विश्वास संपादन करतात. त्यानंतर सावज आपल्या जाळ्यात फसताच तक्रारदारांना मोठा टास्क देत त्यांना 12 ते 50 हजार रुपये भरण्यास सांगून जास्त पैसे कमाविण्याचे आमिष दाखविले जाते. याद्वारे तक्रारदाराची एकूण सव्वाचार लाख रुपयांनी फसवणूक झाली आहे. या प्रकरणी चुनाभट्टी पोलिसांनी गुन्हा नोंदवित अधिक तपास सुरू केला आहे.
चोरट्यांकडून एवढा मुद्देमाल जप्त :या तपासात चौघांना अटक केली आहे. या प्रकरणी अटक केलेल्या आरोपींकडून चुनाभट्टी पोलिसांनी विविध बँकांची, विविध व्यक्तींच्या नावे असलेली एकूण 43 एटीएम कार्ड, 25 चेकबुक, विविध कंपन्यांचे एकूण 22 मोबाइल आणि विविध मोबाइल कंपन्यांचे 32 सीमकार्ड जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणाच्या तपासादरम्यान 24 बँक खात्यांतील एकूण 97 लाख रुपये गोठवण्यात पोलिसांना यश आले आहे.