मुंबई :सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठाने काल शिवसेनेच्या १६ आमदारांच्या निलंबनाच्या मुद्द्यावर निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांना जरी दिसला दिला असला तरीसुद्धा खरी शिवसेना कोणती असा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच प्रतोद कोणाचा राहणार? हा मुद्दा अजूनही अनुत्तरितच राहिला असल्याकारणाने यातून आणखीन न्यायालयीन पेच निर्माण होण्याच्या शक्यता वर्तवल्या जात आहेत.
दोन्ही बाजूंनी वेगवेगळे दावे :16 आमदारांच्या अपात्रतेच्या संदर्भात विधानसभा अध्यक्षांना निर्णय घ्यायचा असला तरी त्याआधी खरा राजकीय पक्ष कोणता? ते त्यांनी ठरवायचे आहे. त्याचप्रमाणे अध्यक्षांनी आपल्या निर्णयापर्यंत पोहोचण्यापूर्वी निवडणूक आयोगाकडे सादर केलेली पक्षाची मूलभूत घटना, अटी व शर्ती आणि पक्षाची नेतृत्व रचना यांचा विचार करावा लागेल. या निमित्ताने दोन्ही बाजूंनी वेगवेगळे दावे केले जाऊ शकतात.
प्रतोद ठाकरेंचा की शिंदेंचा :केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाला मुळ पक्ष म्हणून मान्यता देताना फक्त लोकप्रतिनिधींची संख्या कोणत्या गटाकडे आहे? हा एकच मापदंड लावणे चुकीचे असल्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने म्हटले आहे. याच कारणामुळे ठाकरे गट पुन्हा आयोगाकडे पक्ष नाव आणि धनुष्यबाण या चिन्हाचा दावा करू शकणार आहे. शिंदे गटाला पुन्हा एकदा पक्ष सदस्यांचे पाठबळ असल्याचे आयोगाकडे सिद्ध करावे लागणार आहे. या सर्व बाबी पाहिल्या तर आयोग पुन्हा सुनावणी घेऊन शिंदे गटाच्या पक्ष संघटनेचेही पाठबळ आहे. शिंदे यांना शिवसेनाप्रमुख नेते म्हणून पुन्हा भरत गोगावले यांची नियुक्ती करता येईल. पण तोपर्यंत विधानसभेत प्रतोद ठाकरेंचा की शिंदेंचा हा मुद्दा वादग्रस्त राहणार आहे.