मुंबई SC Notice To NIA : भीमा कोरेगाव दंगल प्रकरणामधील आरोपी प्रा हनी बाबू यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे. त्या याचिकेवर सुनावणीच्या दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं राष्ट्रीय तपास संस्थेला नोटीस बजावली आहे. या प्रकरणी तीन आठवड्याच्या आत राष्ट्रीय तपास संस्थेनं आपलं उत्तर दाखल करावं, असं सर्वोच्च न्यायालयानं आपल्या नोटीसमध्ये नमूद केलं आहे. न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस, न्यायमूर्ती संजय करोल यांच्या खंडपीठाकडून 3 जानेवारीला ही नोटीस बजवण्यात आलेली आहे.
उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान :भीमा कोरेगाव दंगल जानेवारी 2018 या काळात झाली होती. त्यामध्ये अनेक आरोपींवर राष्ट्रीय तपास संस्थेकडून आरोप ठेवण्यात आलेले आहेत. त्या संदर्भातील खटला मुंबईच्या राष्ट्रीय तपास संस्थेच्या न्यायालयात सुरू आहे. मुंबई उच्च न्यायालयात देखील हा खटला सुरू आहे. परंतु या सर्व आरोपींपैकी दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक हनी बाबू यांच्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयानं काही महिन्यांपूर्वी निर्णय दिला होता. त्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होता. सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठानं राष्ट्रीय तपास संस्थेकडून तीन आठवड्यात उत्तर दाखल करावं, अशी नोटीस बजावलेली आहे.