नवी दिल्ली : SC hearing on MLAs disqualification : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना आमदार अपात्रता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं पुन्हा फटकारलं आहे. सुधारित सुनावणीचं वेळापत्रक देण्यासाठी न्यायालयानं 30 ऑक्टोबर तारीख विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिलीय. आज वेळापत्रक सादर न केल्यानं न्यायालयानं नाराजी व्यक्त केलीय. आम्ही वेळापत्रकावर समाधानी नाही. विधानसभा अध्यक्षांना ३० ऑक्टोबर ही शेवटची संधी असून त्यांनी किमान त्या दिवशी वेळापत्रक द्यावं, अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयानं केलीय.
न्यायालयानं काय म्हटलं :11 मे पासून अध्यक्षांनी काय केलं. विधानसभा अध्यक्षांना निर्णय घ्यावाच लागेल, अशी टिप्पणी सरन्यायाधीशांनी केली आहे. तुम्ही ठोस निर्णय घेतला नाही तर, आम्हाला निर्णय घ्यावा लागेल. याचिका निवडणूक आयोगासमोर नसून विधानसभा अध्यक्षांसमोर आहे. आतापर्यंत घेतलेले छोटे-मोठे निर्णय सांगू नका, अध्यक्षांचं वेळापत्रक द्या. दसऱ्याच्या सुट्टीत सुधारित वेळापत्रत द्यावं असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय. न्यायालयही टीव्ही पाहत असल्यानं अध्यक्षांनी मीडियाशी कमी बोलावं, असं म्हणत सर्वोच्च न्यायालयानं राहुल नार्वेकर यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. आजच्या सुनावणीदरम्यान, सॉलिसिटर जनरल तुषार मेहता विधानसभा अध्यक्षांची बाजू मांडताना दिसले.
वेळापत्रकावर समाधानी नाही : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रतेच्या प्रकरणात दिरंगाई केल्या प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर ठाकरे गट, राष्ट्रवादील काँग्रेस (शरद पवार) गटाच्या वतीनं संयुक्त याचिका दाखल करण्यात आली आहे. आजच्या सुनावणीतही सुप्रीम कोर्टानं विधानसभा अध्यक्षांना कठोर शब्दांत फटकारलं आहे. सभापतींनी दिलेल्या वेळापत्रकावर आम्ही समाधानी नाही. सॉलिसिटर जनरल यांनी दसऱ्याच्या सुट्टीत विधानसभा अध्यक्षांशी चर्चा करून सुधारित वेळापत्रक द्यावं, असे स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत.
अध्यक्ष न्यायालयाच्या आदेशाला डावलू शकत नाही :विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे आमदारांच्या पात्र अपात्रतेबाबत लवकर विधिमंडळात सुनावणी करीत नाहीत, असा दावा ठाकरे गटानं केला होता. या याचिकेच्या सुनावणी दरम्यान न्यायालयानं महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांना उद्देशून टिप्पणी केली होती. विधानसभेचे अध्यक्ष सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला डावलू शकत नाहीत. त्याकडं दुर्लक्ष करू शकत नाहीत.