मुंबई: पृथ्वी शॉ आणि त्याचा मित्र आशिष यांचे मुंबई सांताक्रुज येथे एक छोटेसे हॉटेल आहे. त्या हॉटेलमध्ये ते उपस्थित असताना सपना गिल त्या ठिकाणी हजर झाली. सपना गिलला तिच्या एका मित्राने सांगितले की, क्रिकेटपटू पृथ्वी शॉ त्याचे ते हॉटेल आहे आणि त्याच्यासोबत एक सेल्फी घे. मला माहिती देखील नव्हते की, पृथ्वी शॉ हा कोण आहे? काय आहे? पण सेल्फी घेण्याचा मी प्रयत्न केला असता पृथ्वी शॉने तिच्यासोबत बाचाबाची, अरेरावी केली आणि धक्काबुक्की देखील केली. अशा प्रकारे सपना गिलने तक्रार दाखल केली होती; मात्र त्याआधी पृथ्वी शॉने सपना गिलकडून काय काय घटना घडल्या आणि तिने कसा त्रास दिला आहे याबाबत महत्त्वाची एफआयआर पोलीस ठाण्यामध्ये दाखल केली होती. या घटनेनंतर पोलिसांकडून सपना गिल हिला अटक करण्यात आली. परंतु 20 फेब्रुवारी 2023 रोजी तिला जामीन देखील मिळाला. यानंतर हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयापर्यंत पोहोचले.
सत्य माहिती समोर आलेलीच नाही: घटनेसंदर्भात आज (गुरुवारी) झालेल्या सुनावणीच्या वेळी सपना गिल हिचे वकील काशीफ खान यांनी बाजू मांडली की, तिच्यावर भारतीय दंड विधान कलम अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे; मात्र हॉटेलच्या संदर्भात जे काही घडले आहे त्याच्याबद्दल अजून सत्य माहिती समोर आलेलीच नाही. त्यामुळे त्या घटनेची सर्व अंगाने तपासणी आणि चौकशी होणे आवश्यक आहे. ही बाजू ऐकून न्यायालयाने पृथ्वी शॉ याला नोटीस बजावली आहे.