मुंबई- काल सायंकाळपासून पावसाने जोर धरला असल्याने मुंबईची पुन्हा तुंबई झाली. याच दरम्यान सांताक्रूझ वाकोला येथील धोबीघाट परिसरात 2 घरांचा काही भाग कोसळून घरातील 4 जण नाल्यात वाहून गेले. महिलेसह 2 मुलींना बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आले. मात्र, यातील महिलेसह एका मुलीचा रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीच मृत्यू झाला. तर 3 वर्षाच्या मुलीवर व्हि. एन. देसाई रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, चौथ्या मुलीचा शोध अद्याप सुरू असल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली.
सांताक्रूझ धोबीघाट अग्रिपाडा येथील त्रिमूर्ती चाळीमधील 694 व 695 या घरांचा काही भाग कोसळला होता. ही घरे नाल्याला लागून असल्याने घर क्र. 695 मधील 4 जण नाल्यात पडून वाहून गेले. एक महिला व 3 लहान मुली असे 4 जण नाल्यात वाहून गेल्याची माहिती मिळताच स्थानिक रहिवासी आणि पोलिसांनी त्यांना वाचवण्याचे प्रयत्न केले. त्यापैकी एका मुलीला वाचवण्यात पोलिसांना यश आले. तिला पोलिसांच्या वाहनातून पालिकेच्या व्ही.एन देसाई रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिचा मृत्यू झाला. जान्हवी मिलिंद काकडे असे या मुलीचे नाव आहे.