मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले शिंदे गटाचा तसेच भाजपाचा भरपूर समाचार घेतला आहे. आदरणीय मोदी जी यांनी सांगावे निरव मोदी, ललित मोदी, विजय मल्ल्या देशातून कसे पळाले. मेहुल चोक्सी यांना पाठीशी कोण घालत आहे. महाराष्ट्रात राहुल कुल, दादा भुसे, किरीट सोमैया यांनी जो भ्रष्टाचार केला आहे, त्यांच्यावर कारवाई कधी केली जाणार? त्यांना संरक्षण कोण देत आहे? असा प्रश्न त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला आहे. गिरणा ऍग्रो कंपनीचा राज्याचे मंत्री दादा भुसे यांचा १७८ कोटींचा घोटाळा समोर आला आहे. त्याचबरोबर भीमा पाटस कारखान्यात आमदार राहुल कुल यांचे ५०० कोटीचे मनी लॉन्ड्रीग प्रकरण समोर आले आहे. पण त्याबाबत सर्व माहिती देऊनसुद्धा कारवाई का होत नाही? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
धुलाई यंत्रावर फडणवीस यांनी बोलावे :संजय राऊत पुढे म्हणाले की, फडणवीस यांना आतापर्यंत दोन पत्रे दिली आहेत. त्याचे उत्तर त्यांनी द्यावे. त्यांनी मला वेळ द्यावा. भाजपने सुरू केलेल्या धुलाई यंत्रावर फडणवीस यांनी बोलावे. कारवाई करताना मागे पुढे पाहू नका असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात, परंतु ती कारवाई विरोधी पक्षावर करताना, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे.
सीडी, इडीचे गुन्हे होते ते कशाने धुतले गेले :मोदी हे सूर्य, चंद्र, त्याचबरोबर धूमकेतू पण आहेत. मोदींमुळेच प्रकाश पडला आहे. मोदींमुळेच नद्या वाहतात. समुद्र उसळतोय.आपण श्वास घेतो ती हवा आहे ती सुद्धा मोदींमुळेच आहे. परंतु मोदी व त्यांची यंत्रणा भ्रष्टाचाराला कवच कुंडल देत आहे असा आरोपही संजय राऊत यांनी केला आहे. मोदी यांनी निरमा वॉशिंग मशिन सुरू केले आहे. जे आमदार तुमच्याकडे गेले त्यांच्यावर सीडी, इडीचे गुन्हे होते ते कशाने धुतले गेले? त्याचबरोबर सावरकर गौरव यात्रेविषयी बोलताना संजय राऊत म्हणाले आहेत की, सावरकर गौरव यात्रा आज संपली आहे. उद्यापासून त्यांच्या डोक्यातून सावरकर जातील. परंतु त्यांना जिवंत ठेवण्याचे काम आम्ही करू.
फडवणीस यांनी ठाण्यातील बाजार बुणग्यांना आवरावे : ठाण्यामध्ये एका महिलेला जी मारहाण झाली आहे, त्यावर टीका करताना संजय राऊत म्हणाले की, ठाण्यात मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने हे सर्व होत आहे. देवेंद्र फडवणीस यांनी ठाण्यातील बाजारबुणग्यांना आवरावे, असे सांगत गृहमंत्री ठाण्याचे आहेत की नाही? हा प्रश्न सुद्धा निर्माण होतो. एका निशस्त्र महिलेवर १०० महिला हल्ला करतात, ठाण्याचे पोलिस आयुक्त फक्त बघ्याची भूमिका घेतात. आम्हालाही ठाण्यात घुसता येते. यापूर्वीसुद्धा जेव्हा शिवसेनेतून कार्यकर्ते फुटले होते तेव्हा आम्ही कणकवली, मालवण, वेंगुर्ल्यात घुसलो होतो. हे पोलिसांनी लक्षात ठेवावे. पोलिसांना २४ तास घरी बसवा व बघा आम्ही काय करतो, असा धमकी वजा इशारासुद्धा संजय राऊत यांनी दिला आहे.
हेही वाचा :Bombay High Court : न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांच्या विरोधात खोटी तक्रार, वकिलावर बार काउन्सिलकडून कारवाई