मुंबई:दिलीप वळसे-पाटील यांच्या उपस्थितीत आज गृह खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक मंत्रालयात झाली. या बैठकीपूर्वी वळसे - पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची वर्षा निवासस्थानी भेट (Chief Minister's meet) घेतली. त्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले होते. गृहमंत्री वळसे - पाटील यांनी स्पष्टिकरण देताना स्पष्ट केले की, आजची भेट पूर्वनियोजित होती. महाराष्ट्र पोलिसांचा ११२ प्रकल्पांचा शुभारंभ उद्यापासून सुरू होत आहे, त्यासंबंधी मुख्यमंत्र्यांना भेटलो. गृहखात्यावर मुख्यमंत्री बिलकुल नाराज नाहीत. त्यांनी स्वतः त्याबद्दल खुलासा केला आहे. राज्य सरकार परस्परांना विश्वासात घेऊन काम केलं जातं आहे. संजय राऊत यांची भावना बरोबरआहे. आमच्या विभागातून काही कमतरता असेल तर त्यामध्ये सुधारणा केली जाईल, असे वळसे- पाटील म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस भाजपच्या बाबतीत सॉफ्टकॉर्नर घेते का? असा सवाल गृहमंत्र्यांना विचारला असता, सॉफ्ट आणि हार्ड भूमिका काय असते हे मला कळत नाही. मी समोर येतील त्या कागदपत्रांच्या आधारे निर्णय घेतो. कोणती कारवाई करायची झाल्यास ती न्यायालयात टिकली पाहिजे. त्यामुळे सॉफ्ट असायच कारणच नाही. जिथे चूक असेल, तिथे कारवाई होणारच असे मंत्री वळसे- पाटील यांनी स्पष्ट केले. तसेच पोलीस खाते आणि गृहखात्याला कायदे आणि नियमांच्या आधारे कारभार करावा लागतो.