मुंबई : पत्रकारांशी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, कोणत्याही नोटीशीला उत्तर देण्यासाठी त्यासाठी एक प्रक्रिया असते. विधिमंडळाची संसदेची देखील एक प्रक्रिया असते. विधिमंडळाकडून जेव्हा मला नोटीस पाठवण्यात आली त्यावेळी मी मुंबईमध्ये नव्हतो. शिवसेनेच्या काही सभा सुरू आहेत. या सभांसाठी मी मुंबई बाहेर होतो. त्यामुळे विधिमंडळाने पाठवलेल्या नोटिशीला मी उत्तर देऊ शकलो नाही. होळी, धुळवड याच्या सुट्टीनंतर आज पुन्हा अधिवेशन सुरू झाले आहे. विधिमंडळातील माझ्या सहकाऱ्यांशी मी या संदर्भात चर्चा करेन आणि या नोटीसला उत्तर देण्याची काय प्रक्रिया आहे. हे पाहून त्या संदर्भात नक्की उत्तर देईन.
चोर अतिशय योग्य शब्द: विधिमंडळाने पाठवलेल्या हक्कभंगाच्या नोटीसीनंतर संजय राऊत यांच्यावर सध्या कारवाईची टांगती तलवार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, असे असले तरी संजय राऊत आपल्या विधानावर ठाम असल्याचे आज त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. संजय राऊत म्हणाले की, विधिमंडळाचा हक्क भंग होईल अस मी कोणतही विधान केले नाही. मी जे बोललो ते एका विशिष्ट गटापुरते मर्यादित होते. त्या विशिष्ट गटासाठी मी जो चोर हा शब्द वापरला आहे तो अतिशय योग्य शब्द आहे.
देश राज्य परिस्थिती सारखीच: लालूप्रसाद यादव यांच्या घरावर सीबीआयने धाडी टाकल्या. या संदर्भात देखील संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली. राऊत म्हणाले, या देशातील परिस्थिती आणि राज्यातील परिस्थिती एकच आहे. अन्यायाविरुद्ध आवाज उठवाल तर तुम्हाला देशद्रोही ठरवले जाते. आम्ही घाबरत नाही. या लोकांनी अतिशय बेकायदेशीरपणे नाव आणि चिन्ह काढून घेतले तरी शिवसैनिक लढतो आहे. काल सुद्धा लालू यादव यांच्यावर धाडी पडल्या पण गौतम अदानींना नोटीस पण बजावली नाही आणि धाडी कोणावर टाकताय विरोधी पक्षावर. जे चुकीचे आहे त्याच्या विरोधात आम्ही उभे राहणार.
आम्ही आणि जनता शुद्धीत आहोत: मंगळवारी धुळवळीच्या निमित्ताने माध्यमांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या मित्रांना भांग पाजली गेली अशी टीका ठाकरे गटावर केली. देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला देखील खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिले आहे. खासदार राऊत म्हणाले की, त्यांनीच भांग पाजली का? महाराष्ट्रात भांग पिऊन कोण सत्तेवर आले? भांग उतरली की त्यांची सत्ता नक्कीच जाईल. आम्ही पूर्ण शुद्धीत आहोत. महाराष्ट्राची जनता किती शुद्धीत आहे हे कसब्याच्या निवडणुकीवरून स्पष्ट झाले आहे. जे भांग पिऊन सत्तेवर बसलेले आहेत त्यांना कळेल की महाराष्ट्र आणि राज्याची जनता काय आहे आणि त्यांची सगळी भांग कसब्यामध्ये उतरली आहे.
हेही वाचा:Sanjay Raut News 2024 ला विधानसभेत 200 पेक्षा जास्त जागा लोकसभेत 40 जागा जिंकू संजय राऊत