मुंबई :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबईतील येऊ घातलेल्या उद्घाटन कार्यक्रमाच्या निमित्ताने संजय राऊत यांनी माध्यमांसमोर बोलताना शिंदे फडणवीस शासन तसेच केंद्रशासन यांच्यावर हल्लाबोल केलेला आहे. राज्यातील गेलेले उद्योग तुमच्या नाकावर टिच्चून पळवून नेले. तुम्ही काय केले दावोसला जाऊन देखील काय होणार आहे? तसेच केंद्र सरकार सर्व शासकीय यंत्रणांवर दबाव तंत्र वापरत असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला. तसेच कोरोना महामारीच्या काळामध्ये उत्तर प्रदेशात गंगा आणि यमुनेमध्ये मृतदेह तरंगत होते. तसे महाराष्ट्रात बिलकुल होऊ दिलेले नाही. त्याचे कारण महाराष्ट्र विकास आघाडी शासनाच्या काळामध्ये महाराष्ट्र आणि मुंबई या ठिकाणी अत्यंत पारदर्शी आणि व्यवस्थित काम झालेले आहे, असा दावा देखील त्यांनी मुंबई महापालिका आयुक्त इकबालसिंग चहल यांच्या चौकशीच्या निमित्ताने केला.
प्रकल्पांचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते :पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 तारखेला मुंबईत अनेक प्रकल्पांच्या उद्घाटनासाठी येणार आहेत. महाराष्ट्र विकास आघाडी शासनाच्या काळात जे उद्योग, जे प्रकल्प, जे निर्णय घेतले आणि त्याची अंमलबजावणी केली. त्या कार्यक्रमाचे प्रकल्पांचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्याचा हा मानस म्हणजेच पंतप्रधानांच्या पदाला जी प्रतिष्ठा आहे, ती घालवण्याचा हा प्रकार आहे. जर त्यांना प्रतिष्ठा घालवायची असेल तर त्याला आपण काय करणार असे म्हणत त्यांनी शिंदे फडणवीस सरकार तसेच भारतीय जनता पक्षावर विशेष करून प्रहार केला.
संजय राऊतांचा शिंदे फडणवीस शासनावर हल्लाबोल : मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दावोसमध्ये जाऊन काय करणार आहेत, असा सवाल संजय राऊत यांनी केला. सगळ्याच जगातील उद्योगपती उद्योजक त्या ठिकाणी येतात. करारमदार करतात तसे नित्यनेमाने करार होतील. मात्र गुजरातमध्ये गेलेले उद्योग, ते परत आणणार आहेत का? दोन लाख कोटी रुपये गुंतवणुकीचे करार हे परत आणा. या शासनाच्या नाकावर टिच्चून हे उद्योग पळवले गेले आणि हे शासन केवळ पाहत राहिले. राज्यांमध्ये बेरोजगार असलेल्या जनतेला त्यामुळे रोजगार मिळू शकला नाही, असा हल्लाबोल देखील त्यांनी शिंदे फडणवीस शासनावर केला. तसेच तुम्ही जे आता उद्योग आणत आहात त्याच्यातून किती रोजगार मिळणार आहे आणि तुम्ही किती रोजगार दिलेले आहेत ते जनतेला माहीत आहे. हे देखील अधोरेखित करायला ते विसरले नाहीत.