मुंबई Sanjay Raut today News - शिवसेना अपात्र आमदार प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेला निकाल शिवसेना ठाकरे गटाच्या जिव्हारी लागला आहे. अद्यापही यातून ठाकरे गट सावरलेला नाही. याच कारणानं १६ जानेवारी रोजी उद्धव ठाकरे जनतेच्या न्यायालयात महापत्रकार परिषद घेणार आहेत. याबाबतची माहिती शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना दिली. यावेळी खासदार राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही निशाणा साधला.
खासदार संजय राऊत म्हणाले, " विधानसभा अध्यक्षांनी शिवसेनेच्या बाबती दिलेल्या निकालानं संपूर्ण महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण देशात संताप व चीड निर्माण झाली आहे. विधानसभा अध्यक्षांचे पुतळे जाळले जात आहेत. तिरडीवरून त्यांची अंत्ययात्रा काढली जात आहे. ही लोकशाहीची अंत्ययात्रा आहे. राज्यघटना पायदळी तुडवली आहे, अशा प्रकारच्या भावना लोकांच्या मनामध्ये आहेत. अत्यंत खोटेपणाचा कळस म्हणजे हा निकाल आहे. महाराष्ट्रात विधानसभा अध्यक्षांची अशा पद्धतीची अंत्ययात्रा निघाली नव्हती. विधानसभा अध्यक्षपद हे संवैधानिक पद आहे. या पदावरील व्यक्ती कधीच पक्षपाती नसते. परंतु राहुल नार्वेकर यांनी सर्व मर्यादांचे उल्लंघन केलं आहे".
देशाच्या इतिहासातील पहिली खुली पत्रकार परिषद - ठाकरे गटाचे मुख्य प्रवक्ते राऊत म्हणाले,"राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाची चिरफाड करणारी महापत्रकार परिषद उद्धव ठाकरे १६ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वाजता वरळी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स डोम सभागृहात घेणार आहेत. देशाच्या इतिहासातील अशी पहिली खुली पत्रकार परिषद जनतेच्या न्यायालयात उद्धव ठाकरे घेणार आहेत. विधानसभा अध्यक्षांबाबत जनतेच्या मनात इतका राग का आहे. या सर्व बाबींचा खुलासा या महापत्रकार परिषदेत होणार आहे. यासाठी सर्व स्तरातील मान्यवर लोक उपलब्ध असतील. तसेच कायदेशीर क्षेत्रातले प्रमुख लोकसुद्धा उपस्थित असतील. यासाठी जनतेला आमंत्रण देण्यात आलं आहे. जनतेच्या न्यायालयात निकालपत्राची चिरफाड होणार आहे", याबाबत अधिक माहिती उद्धव ठाकरे देणार असल्याचंही खासदार राऊत यांनी स्पष्ट केलं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पक्ष चोरीचा आहे. हिंमत असेल तर एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी स्वतःचा पक्ष स्थापन करा. पक्ष उभा करून मग बोलावं. कुणी काकाचा पक्ष चोरतो आहे तर कुणी दुसऱ्या बापाचा पक्ष चोरतो आहे. हे सर्व दिल्लीतील बापाच्या ताकदीवर पक्ष चोरले जात आहेत. आमचाच पक्ष खरा असून तो जागेवर आहे. म्हणून आमचे दौरे होत आहेत. आमचे कार्यकर्ते, शिवसैनिक जागेवर आहेत. त्यांना मार्गदर्शन करण्यासाठीच उद्धव ठाकरे यांचे दौरे होत आहेत. मुख्यमंत्र्यांनी अगोदर स्वतःचा पक्ष स्थापन करून दाखवावा, मगच टीका करावी- ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत