मुंबई : राज्यात सध्या मध्यावधी निवडणुकांच्या चर्चा सुरू आहेत. मात्र, या निवडणुका विधानसभेच्या असतील की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हे मात्र अद्याप कोणत्याही पक्षाचा नेता स्पष्ट बोलत नाही. अशातच आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी '2024 पर्यंत पुन्हा एकदा महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री होईल. मी बाहेर असो वा नसो शिवसेनेचे आणि शिवसैनिकांचे रक्त वाया जाणार नाही. अनिल देशमुख, नवाब मलिक हे देखील लवकरच बाहेर येतील.' असे वक्तव्य केल्याने पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.
ही महाराष्ट्राची राजकीय परंपरा नाही -कथित पत्राचार घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांना काही दिवसांपूर्वीच जामीन मंजूर झाला. तब्बल 100 दिवसांहून अधिक काळ तुरुंगात असलेल्या संजय राऊत यांनी बाहेर आल्यावर देखील सकाळी माध्यमांशी बोलण्याची त्यांची प्रथा सुरू ठेवली आहे. आज विरोधकांचा समाचार घेताना खासदार राऊत म्हणाले की, "आज माझ्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेचे नेते असतील राष्ट्रवादीचे नेते असतील अनेक नेत्यांचे सकाळपासूनच मला फोन येत आहेत. या सर्वांच्या शुभेच्छा मी स्वीकारतो आहे. आपण जर मागच्या काही दिवसातले राजकारण पाहिले तर ते सूडबुद्धीने केले जात असल्याचे दिसून येईल. सध्याचा राजकारण हे गढूळ आहे. हे वातावरण अस्थिर आणि अविश्वासाचे आहे. या सूडबुद्धीच्या राजकारणाची रोज नवी उदाहरण समोर येत आहेत. ही महाराष्ट्राची राजकीय परंपरा कधीच नव्हती, असे देखील राऊत म्हणाले.