मुंबई - उत्तर प्रदेशातील हाथरस येथील सामूहिक बलात्काराच्या घटनेवर संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त होत आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील या प्रकरणावर भाष्य केले आहे. निर्भयावेळी केंद्रातील महिला नेत्यांनी जी भूमिका घेतली होती तीच भूमिका आताही घेणे गरजेचे आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
आज जे केंद्रात मंत्री आहेत, ते त्यावेळी आमचे साथीदार होते व आजही आहेत. निर्भयाला न्याय मिळावा यासाठी ते त्यावेळी रस्त्यावर उतरले होते. आता मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या राज्यात जेव्हा बलात्कार आणि हत्येच्या घटना होतात, तेव्हा सगळे शांत बसतात. पोलीस यंत्रणा, राजकीय व्यवस्थेने तपास करून गुन्हेगांना फासावर पोहोचवण्याचे काम केले पाहिजे. मात्र, असे होत नाही. त्यामुळे कायद्याची भीती संपत आहे का? असा प्रश्न देखील राऊत यांनी उपस्थित केला.