मुंबई :महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठकीत विधान परिषदेच्या निवडणूकीसाठी महत्वाचा निर्णय घेण्यात आला. खासदार संजय राऊत यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, महाविकास आघाडीच्या उमेदवाराबाबत या निवडणुकीमध्ये अधिकाधिक मतांनी शुभांगी पाटील यांना निवडून आणले पाहिजे, असा निर्णय केला. या संदर्भात महाविकास आघाडीच्या प्रत्येक घटक पक्षांना देखील त्या पद्धतीने ताकद लावावी लागणार आहे. शुभांगी पाटील या योग्याने सक्षम उमेदवार असल्यामुळे त्या निवडून येतील, असे त्यांनी सांगितले.
शुभांगी पाटील योग्य उमेदवार : सक्षम नेतृत्व असल्यामुळे ठाकरे गटाचा पाठिंबा दिलेला आहे. महाविकास आघाडी देखील समर्थपणे शुभांगी पाटीलसह इतर मविआच्या उमेदवारांच्या पाठीमागे भक्कमपणे उभी आहे, असा निर्धार संजय राऊत यांनी व्यक्त केला. काँग्रेसचे डॉ. सुधीर तांबे यांनी आपला एबी फॉर्म भरला नाही. आपला मुलगा सत्यजित तांबे हा अपक्ष उभा राहतो आहे आणि त्याला भाजपचा छुपा पाठिंबा आहे तरीही सुधीर तांबे यांनी यासंदर्भात पक्षाला कळवलं नाही. त्यामुळे सुधीर तांबे तसेच सत्यजित तांबे या दोघांवरील काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी योग्य ती कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.
राजकीय चर्चांना उधाण : सत्यजीत तांबेंच्या उमेदवारीनंतर शुभांगी पाटील या शिवसेनेच्या पाठिंबाने आणि महाविकास आघाडीच्या समर्थनाने या निवडणुकीत नाशिक पदवीधर मतदारसंघांमध्ये उभ्या राहिल्या असल्याचे राऊत यांनी सांगितले. मात्र त्यांचा कालपासून फोन नॉट रिचेबल असल्यामुळे अनेक सवाल उपस्थित केले गेले होते. परंतु शुभांगी पाटील यांनी स्वतः सांगितले की वेळेवरच कळेल की फोन नॉट रिचेबल का होता आणि कोणाचा दबाव होता. काल काही काळापासून शुभांगी पाटील यांचा फोन नॉट रिचेबल आल्यामुळे अनेक तर्क-वितर्क आणि चर्चेला उधाण आले होते. पदवीधर मतदारसंघांमध्ये नाशिकची निवडणूक आता अत्यंत प्रतिष्ठेची झालेली आहे.