महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

संघराज्यांचा 'तो' विचार मारला तर रशियाप्रमाणे भारतातही राज्ये फुटतील - संजय राऊत - तर भारताची राज्ये फुटतील

२०२० या मावळत्या वर्षात केंद्र सरकारकडून केलेल्या राजकारणावर संजय राऊत यांनी टीका केली आहे. २०२० हे वर्ष केंद्र सरकारच्या विश्वासहर्तेवर आणि कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे असल्याची टीका त्यांनी केली आहे. तसेच कंगना अर्णबला महत्व देणारे सरकार देशातील इतर महत्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही राऊत यांनी त्यांच्या रोखठोक सदरातून केला आहे.

sanajy raut
संजय राऊत

By

Published : Dec 27, 2020, 8:49 AM IST

मुंबई- 2020 हे वर्ष अनेक घडामोडींनी चर्चेला आले. त्यामध्ये कोरोनाच्या महामारीने जनजीवनच विस्कळीत केले. मात्र, अशा काळातही देशाच्या राजकारणात कुरघोडीच्या आणि सरकार पाडापाडीच्या राजकारणाला अच्छे दिन दिसून आले. मात्र, या मावळत्या वर्षाने काहीच चांगले पेरले नाही, त्यामुळे नवीन वर्षात चांगले काही उगवणार नाही, अशी शक्यता शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे. ही शक्यता व्यक्त करताना भाजपाच्या राजकारणावरही सडकडून टीका केली आहे,

भाजपशासीत नसलेली राज्ये या राष्ट्राशीच नाते सांगत असताना तो विचार भाजप सरकारकडून मारला जात आहे. मात्र, राजकीय साठेमारीत जनतेचे नुकसान करणारे अशा प्रकारचे निर्णय घेतले गेल तर रशियाप्रमाणे भारतातही राज्ये फुटतील अशी भीती राऊत यांनी व्यक्त केली आहे.

देश कर्जाच्या खाईत जातोय-

राऊत यांनी सामनात लिहलेल्या रोखठोक सदरामधून भाजपावर निशाणा साधताना म्हटले आहे की, मावळत्या वर्षाने महागाई, बेरोजगारी आर्थिक डबघाई निऱाशेचे ओझे उगवत्या वर्षावर टाकले आहे. मात्र, अशा स्थितीत सरकारची तिजोरी रिकामी असतानाही, मोदी सरकारकडे विरोधकांची सरकारे पाडण्यासाठी भाजपची सत्ता आणण्यासाठी पैसा आहे. देश कर्जाच्या खाईत जात असताना, आपल्या पंतप्रधांना शांत झोप लागत असेल, तर त्यांचे कौतुक करायला हवे, असा उपरोधिक टोलाही राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला आहे.

तर देशाचे कसे होणार-

बिहार निवडणुकीत तेजस्वी या तरुणाने मोदींना टक्कर देत आव्हान उभे केले. मात्र, तिथे आलेले नितीशकुमार यांचे सरकार प्रामाणिक मार्गाने आले नाही. मध्यप्रदेशातील काँग्रेसचे आमदार फोडून कमलनाथ सरकार पाडले, त्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी विशेष प्रयत्न केल्याचा गौप्यस्फोट भाजपचेचे नेते विजय वर्गीय यांनी केला होता. त्यामुळे राज्यातील सरकारे अस्थिर करण्यात देशाच्या पंतप्रधांना रस असेल तर देशाचे कसे होणार? असा सवाल राऊत यांनी केला आहे.

पंगना-अर्णबसाठी रस्त्यावर-

पंतप्रधान हे देशाचे आहेत. संघराज्य बनून देश उभा आहे. ज्या राज्यात भाजपाची सत्ता नाही. ती राज्येही देशाशी नाते सांगत आहेतच की, मात्र, तो विचारच मारला जात असल्याचा घणाघाती आरोप संजय राऊत यांनी भाजपावर केला आहे. मध्य प्रदेशात सरकार पाडले. काश्मीर खोऱ्यात अस्थिरता कायम आहे. लडाखमध्ये चीनची घुसखोरी झाली आहे. पंजाबच्या शेतकऱ्यांवर अन्याय सुरू आहे, असे असताना सरकार पंगना रणौत आणि अर्णब गोस्वामीला वाचविण्यासाठी रस्त्यावर उतरत असल्याची टीका संजय राऊत यांनी केली.

तर रशियासारखी राज्ये फुटतील-

राज्यात मुंबई मेट्रो प्रकल्पाच्या कारशेडला विरोध करत अडवणूक केली जात आहे. ती राजकीय अंहकारासाठी केली जात असल्याचा आरोपही राऊत यांनी केला आहे. मात्र, अशा प्रकारच्या राजकीय साठमारीत आपण जनतेचे नुकसान करत आहोत, याचे भान केंद्र सरकारला ठेवता आले नाही तर राशियातील राज्ये फुटली तसे आपल्या देशात घडायला वेळ लागणार नाही, अशी भीती संजय राऊत यांनी व्यक्त करत केंद्राला सतर्कतेचा सल्ला दिला आहे.

सरकारच्या विश्वासहर्तेवर प्रश्नचिन्ह-

केंद्र सरकारच्या विश्वासहर्तेवर आणि क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे वर्ष म्हणून २०२० या वर्षाकडे पाहावे लागेल. राज्य आणि केंद्र सरकारचे संबंध बिघडत आहेत. सर्वोच्च न्यायालय आपले कर्तव्य विसरून गेले आहे. देशाचे भविष्य उज्ज्वल करणे किंवा अधोगतीला घेऊन जाणे हे दोन चार जणांच्या हातात असणे ही भारतीय समाज जीवनाची शोकांतिकां असल्याची टीकाही राऊत यांनी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details